अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी आंबोलीत सोडू नयेत…

आंबोली ग्रामस्थांची वन विभागाला निवेदनाद्वारे विनंती…

⚡आंबोली ता.०८-: आंबोली वन परीक्षेत्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्या व कोल्हापूर जिल्ह्यात पकडलेले वन्य प्राणी मुख्यत्वे माकड, बिबटा इत्यादी वन विभागामार्फत सोडण्यात येतात.आंबोली परिसरातील जनता गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या कबूलयतदार गावकर जमीन प्रश्न मुळे फार मोठा प्रमाणात त्रस्त आहे.

आंबोली परिसरातील येथील जनतेला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई भेटत नाही मग ती वन्य प्राण्यांमुळे, असो अथवा अतिवृष्टी किंवा अवकाळी वृष्टी असो किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असो. आंबोली परिसरातून बेळगाव व कोल्हापूर या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता जातो व वाहतूक मोठया प्रमाणात असते. बऱ्याच वेळा वन्य प्राणी मुख्य रस्त्यावर येऊन अपघात घडत असतात. व त्यात वन्य प्राणी व मनुष्य हानी ही मोठ्या प्रमाणात होत असते.
आंबोली परिसरात मानवी वस्तीत वन्य प्राणी येत असल्यामुळे आंबोली परिसरात नेहमीच वन विभाग, वन्य प्राणी व मनुष्य यांच्यात संघर्ष होत असतो. वन विभाग आंबोली परिसरात जिल्ह्यातील इतर ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी सोडत असल्याचे समजते.
आंबोली परिसरातील ग्रामस्थांवर बऱ्याच वेळेस वन्य प्राण्या कडून हल्ले देखील झाले आहेत. आंबोली परिसरातील पिढ्यान पिढ्या राहणारे ग्रामस्थ वन्य प्राण्याच्या त्रासामुळे शेती व्यवसाय सोडत चालला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी हे आंबोली परिसरात न सोडता त्यांना अभयारण्यात सोडावे, जेणे करून दिवसेंदिवस वाढत असलेले वन्य प्राणी व मानव यांच्यात होत असलेले संघर्ष कमी होतील व त्याच वेळेस अपघात होऊन होणारे वन्य प्राणी व मनुष्य व मालमत्ता नुकसान हि कमी होईल.
या पुढे वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडण्यास मनाई करण्यास आपल्या स्तरावरून संबधीत विभागास तातडीने आदेश द्यावे अशी विनंती आंबोली सरपंचासह ग्रामस्थांनी वनविभागाला केली.
यावेळी आंबोली प्रमुख गावकर श्री.शशिकांत गावडे ,आंबोली भाजपा प्रमुख श्री रामचंद्र गावडे ,आंबोली विकास सोसायटी उपाध्यक्ष श्री.महादेव गावडे ,आंबोली बूथ अध्यक्ष श्री तुकाराम पाटील, आंबोली भाजपा कार्यकर्ते श्री संतोष पालेकर ,आंबोली शिवसेना कार्यकर्ते श्री विशाल बांदेकर , पत्रकार श्री.विजय राऊत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page