बालसाहित्यीक गोविंद पाटील:देवगड केंद्रातील विद्यार्थ्यांचा बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी कार्यक्रम उत्साहात..
देवगड (प्रतिनीधी)
भाषिक खेळ म्हणून कविता आपण सहजपणे करु शकतो. त्यासाठी कोणताही नियम लागू नसतो. तुम्ही जे बघता त्या निरीक्षणातून व न्याहाळण्यातून सहज कविता बनते. निरीक्षण फार महत्त्वाचे असते. भाषेचे बंधन कवितेला नसते. त्यामुळे कोणत्याही बोलीभाषेत कविता लिहीता येते असे प्रतिपादन कोल्हापूर येथील जेष्ठ बालसाहित्यीक गोविंद पाटील यांनी केले.
प्राथमिक शाळा देवगड येथे आनंददायी शनिवार अंतर्गत देवगड केंद्रात बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी असा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
बालसाहित्यीक गोविंद पाटील यांनी देवगड केंद्रातील विद्यार्थ्यांशी मनमुराद गप्पा करीत कविता सादर केल्या. या संवादातून नकळतपणे विद्यार्थी कवितांच्या भावविश्वात रममाण झाले होते. कविता सहजपणे करता येते याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. मूळ कोल्हापूरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी,बालसाहित्यिक गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्याना काव्य लेखनाचा जिवंत अनुभव देत काव्य लेखन कसे करावे याचा वस्तुपाठ दिला. महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या अनेक बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे .त्यांचा थुईथुई आभाळ हा बाल काव्य संग्रहासह अनेक काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांनी दिलेल्या ओळीची पुढील ओळ स्वतः तयार करीत कार्यक्रमात रंगत आणली.कवितेचे यमक कसे जुळवावे कल्पनाशक्तीचा वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना दिले .
त्यांनी अनेक बडबड गिते सादर करताना विद्यार्थी सहभाग वाढवत नेला. त्यात अंकांचे गाणे ,बोबडे बोल असणारे गाणे असे अनेक काव्य प्रकार उलगडले. यावेळी बोलताना श्री. पाटील यांनी आपली भाषा म्हणजे सर्वोच्च असे कधीही होत नाही. भाषा कोणतीही वाईट नसते. कोणत्याही भाषेत आपण कविता लिहू शकतो. यासाठी पहिले आपले वाचन असणे महत्त्वाचे आहे. जो वाचतो तो लिहू शकतो जो चांगले ऐकतो तो वक्ता बनू शकतो. आपल्याला कविता, लेख लिहायचे असेल तर सर्व प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत असे सांगितले. शब्द खेळ घेत रंगलेला हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या गटविकास अधिकारी श्रीमती वृक्षाली यादव यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळातून असे उद्बोधक कार्यक्रम होत असले बद्दल समाधान व्यक्त केले.नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत अश्या कला छंद जोपासणे जीवनावश्यक कौशल्य असल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी कला असावी. त्यातून जीवन समृद्ध होते. प्रत्येक शाळांमध्ये असे उपक्रम राबविले जावेत त्यातून पालकांनाही आपल्याला पाल्याला जि. प. शाळेत पाठविण्याची ओढ निर्माण होईल व पटसंख्या वाढीस मदत होईल. चांगल्या शिक्षकांमुळेच आज जि. प. च्या शाळा सुरु आहेत. पालकांपेक्षा शिक्षक मुलांबाबत जागृत असतात. शिक्षकामुळेच शाळा चालते असेही कौतुक श्रीमती यादव यांनी केले.
याप्रसंगी देवगड तालुक्यातील सुप्रसिध्द कवी प्रमोद जोशी यांनी बाल साहित्याचे महत्व विशद करीत आशयघन कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सहायक प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे यांनी बालपणीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला अशी दाद देत पाटील यांच्या कविता आणि शीळ गाण्याच्या दुर्मिळ कलेला भरभरून दाद दिली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रप्रमुख आनंद जाधव यांनी देवगड केंद्रात राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती दिली. अश्या कार्यक्रमातून भविष्यात उत्तम लेखक कवी वक्ते घडू शकतात यासाठी निरंतर प्रयत्नांची गरज असणे आवश्यक आहे असे आवाहन केले. सडा शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणारी कु.चैतन्या पांचाळ हिने सुप्रसिध्द कवयत्री शांता शेळके यांची कविता योग्य स्वराघातासह सादर करीत वाहवा मिळविली.कार्यक्रमाला देवगड केंद्रातील शिक्षक मुख्याध्यापक आणि निवडक विद्यार्थी,पालक, पत्रकार प्रतिनिधी राजेंद्र मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करणेत आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, सचिन जाधव यांनी करत कार्यक्रमास शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
