स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली च्या माध्यमातून मसाला प्रशिक्षण संपन्न…!

⚡कणकवली ता.०२-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली च्या माध्यमातून व कांचनताई परुळेकर स्वयंसिद्धा कोल्हापूर यांच्या सहकार्यातून गोपुरी आश्रम या ठिकाणी मसाला प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी अधिकारी श्री. राजन सावंत यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणांमध्ये स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट व स्वयंसिद्धा कोल्हापूर यांनी अश्या प्रकारचं प्रशिक्षण कणकवलीत आयोजित केल्या बद्दल त्यांचे स्वागत केलं. महिलांनी अश्या प्रकारच्या चांगल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग करावा असे सूचित केले. प्रत्येकाच्या हाताला चव असते पण काहींचेच पदार्थ का चांगले होतात, तर योग्य प्रमाण वापरल्या मुळे होत असतात. उद्योग करीत असताना योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतलं, त्यातील टिप्स समजून घेतल्या, विक्री व्यवस्था कशी करावी हॆ समजून घेतलं तर भविष्यात चांगले उद्योजिका होऊ शकतातअसे मत त्यांनी व्यक्त केले.उद्योग करण्यासाठी कृषी विभागा कडे अनेक प्रकारच्या योजना आहेत व त्यांना अनुदान पण आहे त्याचा महिलांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदीप सावंत यांनी स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्वयंदीप तनुज गोधडी हा उदयोग चालू आहे त्यामध्ये अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले. स्वयंदीप चा मुख्य उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त महिला उद्योजीका निर्माण व्हाव्यात. जास्तीत जास्त महिलांनी स्वयं रोजगारातून आर्थिक उन्नती साधावी यासाठी महिलांना आवश्यक असणारे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल व त्याचा महिलांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले
या प्रशिक्षणाला कणकवली व आजूबाजूच्या गावातील महिला उपस्थित होत्या. त्यावेळी महिलांना स्वयंसिद्धा कोल्हापूर येथील प्रशिक्षिका सौ.वंदना सावंत व सौ. अर्चना करगुप्पीकर यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिका करून दाखविले त्या मध्ये कोल्हापुरी मसाला चटणी, गरम मसाला, गोडा मसाला, मालवणी मसाला, सांबर मसाला, चाट मसाला, पावभाजी मसाला, छोले मसाला, पुलाव मसाला, चिवडा मसाला, पापड मसाला व चहा मसाला इत्यादी मसाले शिकविले व मसाले करताना घ्यावयाच्या छोट्या छोट्या टिप्स त्यांनी महिलांना दिल्या.
या प्रसंगी प्रशिक्षणार्थी सौ. स्वरा गावडे,सौ. सुजाता म्हाडेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की अशा प्रकारचे मसाले आपण घरच्या घरी बनवू शकतो व स्वतःसाठी त्याचा वापर करू शकतो आणि आपण उद्योग केला तर त्याला चांगल मार्केट मिळू शकते. तसेच स्वयंसिद्धा च्या टिम ने चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले व स्वयंदीप ने याचे आयोजन केले म्हणून धन्यवाद दिले. तसेच अशा प्रकारची प्रशिक्षण घेऊन भविष्यात महिला उद्योजिका तयार होतील असा मानस त्यांनी बोलून दाखवलं.
पाहुण्यांचे स्वागत मंजिरी वारे, माधुरी सावंत, स्मिता सावंत व स्मिता काणेकर यांनी केले तर आभार स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत यांनी केले त्यावेळी गोपुरी आश्रमचे सचिव विनायक मेस्त्री, अॕड. सौ. मनीषा सावंत व सदाशिव राणे उपस्थित होते.

You cannot copy content of this page