⚡कुडाळ ता.३०-:
कुडाळ शहराच्या नजीकहून वाहणाऱ्या भंगसाळ या नदीतील गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शिवसेना युवासेनेतर्फे आज निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे माजी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतीमधील शिवसेना नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ शहराच्या नजीक वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होते. यामुळे येथील शेती आणि व्यापारी वर्गाचे नुकसान होते. या नदीतील गाळ काढल्यास नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
तसेच हा गाळ काढल्यास नजीकच्या केटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा निर्माण होईल. या पाण्याचा उपयोग कुडाळ शहर, एमआयडीसी, शेती आणि चिपी विमानतळास होतो. त्यामुळे नदीतील गाळ काढल्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच एप्रिल आणि मे महिना अखेरीस होणाऱ्या पाणीटंचाई आणि पुरस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उप नगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका श्रेया गवंडे, माजी नगरसेवक सचिन काळप आदी उपस्थित होते.
भंगसाळ नदीतील गाळ काढण्याबाबत ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
