⚡मालवण ता.३०-
कोकण विभागीय कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्यात सर्वप्रथम आंब्याची थेट विक्री करणारे मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या साळेल आणि कुंभारमाठ मधील हापूस आंबा बागेला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्यासमवेत विभागीय कृषी अधीक्षक श्री. बालाजी ताटे साहेब, पुणे आयुक्त कार्यालयातील एम. आर. जी. एस विभाग तंत्र अधिकारी श्री. डॉ. बनसोडे हे उपस्थित होते. अंकुश माने यांनी उत्तम फोंडेकर यांच्या आंबा बागेतील झाडावरील फळांची तसेच काजू प्रक्षेत्राची पाहणी केली. तसेच ‘वसंतसम्राट ‘या नवीन शोध लावलेल्या वाणाची आणि एस. के. यू. या नवीन शेवग्याच्या वाणाची व इतर झाडांचीही पाहणी करून त्याचे व्यवस्थापन, सात -बारा आणि संबंधित कागदपत्रांची छाननी केली. तसेच फोंडेकर यांना हापूस आंब्याच्या आगाप फळंबद्दल प्रश्न विचारले त्यांची समाधानकारक उत्तरे फोंडेकर यांनी दिली.
यावर्षीच्या हापूस आंब्याच्या पेटीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याबद्दल माने, ताटे आणि बनसोडे यांनी फोंडेकर यांना पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवण तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी परब, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, कृषी सहाय्यक किशोर कदम आदी उपस्थित होते.
