माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रयत्नाला यश:नगरपालिकेने वर्षभराने केली कार्यवाही..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर नगरपालिकेच्या वतीने बसवण्यात आलेला हायमास्ट टॉवर गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीं याच्या मालवण दौऱ्यावेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव खाली उतरविण्यात आल्यानंतर गेले वर्षभर धूळखात पडून असलेल्या या हायमास्ट टॉवरबाबत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर हा हायमास्ट टॉवर पुन्हा उभा करून प्रकाशमान करण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मालवण शहरातील बोर्डिंग मैदानावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असावा या उद्देशाने टोपीवाला हायस्कूलच्या मागणी प्रमाणे तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कार्यकाळात हायमास्ट टॉवर बसविण्यात आला होत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर २०२३ रोजी नेव्ही डे च्या निमित्ताने मालवणात आल्यावर त्यांचे आगमन मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड येथे हेलिकॉप्टरने झाले होते. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर लँडिंगला अडथळा होणारा हा हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवला होता. आता पंतप्रधान यांचा दौरा होवून जवळपास सहा महिन्याचा कालावधी लोटल्यावर देखील तो हायमास्ट पुन्हा उभारण्याबाबत कुठलीही कार्यवाही मालवण नगरपरिषदेकडून झाली नसल्याने मे महिन्यात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आवाज उठवत नगरपालिका प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली होती. मात्र त्या नंतरच्या काळातही हायमास्ट टॉवर लावण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. मात्र महेश कांदळगावकर यांनी याबाबत सातत्याने आवाज उठवत प्रशासनाला धारेवर धरले होते तर विद्यमान आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधण्यात आले होते अखेर वर्षभरानंतर हा हायमास्ट टॉवर पुन्हा उभा करून प्रकाशमान करण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
