कुडाळ हायस्कुलच्या प्रेम आणि हर्षदचा प्रामाणिकपणा…

मुलांमुळे सापडले गहाळ झालेले मंगळसूत्र:तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले मुलांचे कौतुक..

कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफिस नजिक वेलनेस मेडिकल समोर सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे गहाळ झालेले मंगळसूत्र कुडाळ हायस्कूलचे विद्यार्थी प्रेम मारुती ओबासे व हर्षद गुरुनाथ परब या दोन शाळकरी मुलांना सापडले होते. या दोन शाळकरी मुलांच्या प्रामाणिकपणामुळे कुडाळ तहसिलदार वीरसिंग वसावे व नायाब तहसिलदार प्रतिक आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे दांपत्याच्या हाती गुरुवारी कुडाळ तहसील कार्यालय येथे ते सुपूर्द करण्यात आले.यावेळी प्रेम ओबासे व हर्षद परब या मुलांचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी खास कौतुक करत जीवनात अशीच प्रामाणिकपणा ठेवा, जिद्द, चिकाटी ठेवून चांगला अभ्यास करा मोठे व्हा असे सांगत पाठीवर शाबासकीची थाप मारली. शिंदे दांपत्यांनेही त्या मुलांना खास धन्यवाद देत तहसीलदार श्री. वसावे व नायब तहसिलदार श्री.आढाव यांच्यासह अधिकारी -कर्मचारी वर्गांना खास धन्यवाद दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुरेश शिंदे माणगाव वरुन आपल्या पत्नीला घेऊन कुडाळ मध्येआले होते. कुडाळ येथील तनिष शोरूम मध्ये मंगळसूत्राच्या किरकोळ दुरुस्तीचे काम करून ते कुडाळ मध्ये इतर काही खरेदी करून सायंकाळी परत आपल्या माणगाव येथील घरी पोहोचले, घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला दुरुस्त करून आणलेले मंगळसूत्र पिशवीत दिसून आले नाही,त्यांनी पिशवीत शोधाशोध सुरू केला मात्र मंगळसुत्र आढळून आले नाही.आपल्या चुकीमुळेच मंगळसूत्र पडले असल्यामुळे त्यांनी कुठे तक्रार दाखल केली नव्हती.
.दुसरीकडे कुडाळ हायस्कूल मधील इयत्ता आठवी शिकत असलेल्या प्रेम ओबासे व हर्षद परब या दोन मित्रांना संध्याकाळच्या सत्रात खेळण्यासाठी बाहेर जात असताना त्या मंगळसूत्राची वेलनेस मेडिकल जवळ डबी मिळाली. त्या डबीत मंगळसूत्र असल्याचे त्यांना दिसून आले.या दोन्ही मित्रांनी त्याच ठिकाणी असलेल्या काही नागरिकांना याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी ती डबी आपली नसल्याचे सांगितले त्यानंतर प्रेम ओबासे याने याबाबतची कल्पना कुडाळ तहसीलदार यांच्या गाडीवर चालक म्हणुन काम करत असलेल्या आपल्या वडीलांना दिली.चालक मारुती ओबासे यांनी याबाबत आपले वरिष्ठ तहसीलदार वीरसिंग वसावे यांना माहिती दिली.
त्यानंतर तहसिलच्या सोशल मीडिया ग्रुप वर याबाबतचा मेसेज फॉरवर्ड करण्यात आला. तो मेसेज शिंदे दांपत्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर गुरुवारी कुडाळ तहसीलदार यांच्या दालनात त्या वस्तूची ओळख पटवून कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळसूत्राची डबी शिंदे दांपत्याच्या हाती सुपूर्द करताच शिंदे दांपत्य भारावून गेले. यावेळी तहसीलदार श्री.वसावे यांनी प्रेम ओबासे व हर्षल परब या दोन लहान मुलांच्या प्रामाणिकपणाबद्दल खास कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप मारली. शिंदे दांपत्यांने सुद्धा प्रेम ओबासे व हर्षद परब यांचे पुष्पगुच्छ देऊन खास धन्यवाद देत छोटंसं बक्षिसही दिले.

You cannot copy content of this page