कणकवली येथे साहित्य- संगीत संमेलनाचे आयोजन…

कणकवली : साहित्य-संगीतप्रेमी मित्रमंडळ कणकवलीतर्फे जानेवारी २०२५ मध्ये कणकवली येथे साहित्य- संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य संगीत रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी केले आहे.

एका कलेचा दुसऱ्या कलेशी निकटचा संबंध असतो. किंबहुना सर्वच कला एकमेकांशी प्रवाहित झालेल्या असतात. साहित्य आणि संगीत या दोन कला तर एकमेकांना अधिक पूरक असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर येथील साहित्य-संगीतप्रेमी मित्रमंडळातर्फे साहित्य-संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत कलाकारांना तसेच साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

संमेलनाचे अध्यक्ष आणि संमेलनाची रीतसर रूपरेषा काही दिवसांतच जाहीर करण्यात येईल. मात्र, या संमेलनात नव्या गुणवंत गायकांची गाणी तसेच निमंत्रित कवींचे कविसंमेलन आणि संगीत व साहित्या आणि कला क्षेत्रातील प्रत्येकी एका गुणवंत कलावंताचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहितीही चव्हाण आणि भंडारे यांनी दिली.

कविसंमेलनात कोणत्याही भागातील कवी सहभागी होऊन शकतात. मात्र, तीस कवींना निमंत्रिता करून त्यांचे कवितावाचन आयोजित केले जाणार आहे. त्याचबरोबर या सहभागी कवींचा स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सत्कारही केला जाणार आहे. प्रथम नाव नोंदविणाऱ्या कवींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचे आवाहन महेंद्र चव्हाण व सुभाष भंडारे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page