आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन..
कणकवली : जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, कणकवली पंचायत समिती व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ९ ते १० डिसेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष महेश सावंत, सरपंच संजना आग्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा असून, या प्रदर्शनात कणकवली तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती सादर करणार आहेत. तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्याही विज्ञान प्राकृती मांडण्यात येणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी प्राथमिक गट व माध्यमिक गटाच्या दोन गटांमधून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.
तसेच विद्यार्थी, शिक्षक व प्रयोगशाळा परिचर यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण होणार आहे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक गटांच्या प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार आहेत. कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा. तसेच विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, विज्ञानप्रेमी यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. रासम यांनी केले आहे.
