अधिकाऱ्यांना कोंडण्याची भाषा करण्यापेक्षा केंद्र शासनाचे अपयश कबुल करा…

हरी खोबरेकर यांचा भाजपला टोला

*💫मालवण दि.१७-:* बीएसएनएलच्या अनेक अधिकारी, कर्मचारी यांचे पगार थकले आहेत. अनेक कार्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अन्य नेटवर्क कंपन्यांसाठी बीएसएनएल बंद करण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. बीएसएनएल सेवेवर या सर्वाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे खंडित सेवेप्रश्नी अधिकाऱ्यांना कोंडण्याची भाषा करणाऱ्या मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केंद्र शासनाच्या अपयशाची कबुली द्यावी, असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे. मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने बीएसएनएल नेटवर्क सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ठप्प सेवेमुळे संपर्क यंत्रणाच ठप्प झाली आहे. अन्य उपलब्ध नेटवर्क सेवेतही समस्या आहेत. अशा अनेक तक्रारी आहेत. मात्र याला सर्वस्वी केंद्र शासन जबाबदार आहे. केंद्र शासनाचे खाजगीकरण धोरणच या सर्वाला जबाबदार आहे, असा आरोप खोबरेकर यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून केला आहे. ग्रामीण भागात सर्वात जास्त ठिकाणी पोहचलेले नेटवर्क म्हणजे बीएसएनएल. मात्र बीएसएनएल जणू केंद्र शासनाने विकायला काढली अशी स्थिती आहे. अनेक टॉवर बंद पडत आहे. सेवा द्यायला कर्मचारी नाहीत. असलेल्या कर्मचारी यांचे पगार नाहीत. हा कारभार आंधळं दळतय आणि कुत्रं पिठ खातय असाच आहे. त्यामुळे केंद्र शासनाचे अपयश लपवून अधिकारी वर्गाला कोंडण्याच्या वल्गना चिंदरकर यांनी करू नये, असा सल्ला खोबरेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page