उद्धव ठाकरे:शिवसेना म्हणजे कोकण, हे नाते आजपर्यंत कोणी तोडू शकले नाही, आणि आताही कोणी तोडू शकणार नाही…
⚡मालवण ता.१३-: लोकसभेत जे झालं ते झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र तसे होता कामा नये याची दक्षता घ्या नाहींतर आता तुम्ही चुकलात तर गुंडांचे राज्य येऊन तुम्हाला दोन्ही पोर खांद्यावर आणि बाप डोक्यावर घेऊन लाचार होऊन चालावं लागेल
अशी घणाघाती टीका करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करीत ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या मातीची शपथ घेऊन वैभव नाईक ज्याप्रमाणे शिवसेनेच्या पाठीशी इमानाने उभा राहिला तसंच आपणही भगव्याच्या पाठीमागे, मशालीच्या पाठीमागे उभे राहा, असे आवाहन त्यांनी मालवण येथे बोलताना केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी सभास्थळी मालवणातील शिवसैनिकांच्यावतीने उद्धव ठाकरे यांना भव्य पुष्पमाला घालून आणि फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करून स्वागत करण्यात आले. तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, मिलिंद नार्वेकर, भाई गोवेकर, गौरीशंकर खोत, संजय पडते, जान्हवी सावंत, अमित सामंत, व्हीक्टर डांटस, नितीन वाळके, हरी खोबरेकर, शिल्पा खोत, उमेश मांजरेकर, आर्या गावकर, निनाक्षी मेतर, यतीन खोत, मंदार केणी, बाबी जोगी, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, मेघनाद धुरी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जाहीर सभेस तालुक्यातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा झाली आता विधानसभे- साठी आलो आहे, लोकसभेत आपण थोडे कमी पडलो, त्यामुळे आपला पराभव झाला. कोकणातील पराभव हा माझ्या हृदयाला चटका लावून गेला, कारण कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण, हे नाते आजपर्यंत कोणी तोडू शकले नाही, आणि आताही कोणी तोडू शकणार नाही. ज्या ज्या वेळी कोकणावर संकट आले त्या त्यावेळी शिवसेना धावून आली, आणि ज्या ज्यावेळी शिवसेनेवर संकट येते तेव्हा कोकण ठाम उभा राहतो असे सांगत श्री ठाकरे म्हणाले, आज शिवसेना अडचणीत नाही तर तुम्ही अडचणीत आहात, महाराष्ट्र अडचणीत आहे त्याच्यासाठी मी आज इथे आलो आहे म्हणून मला तुमची मदत पाहिजे, म्हणून मला तुमची साथ पाहिजे म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आज मोदी आणि शहा हे आपली शिवसेना संपवायला निघाले आहेत, आजपर्यंत असे घडले नव्हते. पक्ष फुटतात, काही माणसे इकडची तिकडे जातात, तिकडचे इकडे येतात हे राजकारणात ठीक आहे. परंतु शिवसेना संपविण्याचा नीचपणा एकेकाळचा मित्र आज करत आहे. जेव्हा महाराष्ट्रात भाजपा कुठेही नव्हती तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व, देश, महाराष्ट्र याच्यासाठी भाजपशी युती केली. परंतु आज हे लोक शिवसेनेला वापरून फेकून देत आहेत, अशा लोकांना आपण धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,
श्री ठाकरे पुढे म्हणाले, कुणीतरी मला आव्हान दिले की रस्त्याने येऊन परत जाऊन दाखवा, त्यांना मी सांगू इच्छितो की, नशिबाने दिलंय ते घरी बसून नीट खा, मध्ये आलात तर वेडेवाकडे होऊन खाण्यात काही अर्थ नाही. आडवे आलात तर आडवे करू तेवढी ताकद आणि हिंमत या शिवसेनेमध्ये आहे असा इशारा देत ते म्हणाले, तुम्हाला कोकणचे वैभव हे वैभव नाईक यांच्या रूपाने जपायचे आहे की नाही ? की गुंडा पुंडांचे राज्य हवे असे असा सवाल त्यांनी यावेळी केला.
ठाकरे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणीतील पुतळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तो पैसे खाऊन केला आहे, मोदी हे शिवभक्त नाही, ऊन वारा पाऊस,लाटा सहन करून सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे मात्र दाढीवाले मिंधे हा पुतळा वाऱ्याने पडला म्हणताहेत. हा खाली मुंडी पातळ धुंडी म्हणतोय, वाईटातून चांगलं होतं असं म्हणणाऱ्या केसरकर यांचा पराभव झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चांगलं होणार असे ठाकरे म्हणाले.
यावेळी विनायक राऊत, परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, अमित सामंत आदींची भाषणे झाले.
