मालवण कुडाळचा विकास प्रामाणिकपणे व भ्रष्टाचार मुक्त केला…

वैभव नाईक: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार..

⚡मालवण ता.१३-: कणकवली, सावंतवाडी मतदार संघापेक्षा कुडाळ मालवण मतदार संघाचा विकास हा प्रामाणिकपणे, भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. आपल्या मतदारांचा कुठेही अपमान होईल. त्यांची मान खाली जाईल असा एकही प्रसंग होऊ दिला नाही. अनेकांनी गद्दारी केली मात्र मी मतदारांशी, शिवसेनेशी गद्दारी केली नाही आणि कधीही करणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह या मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. त्यामुळे या निवडणुकीत मला विजयी करत सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन आम. वैभव नाईक यांनी मालवण येथील जाहीर सभेत बोलताना केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ येथील टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आम. नाईक हे बोलत होते. यावेळी तारकर्लीच्या माजी सरपंच स्नेहा केरकर व विद्यमान ग्रा. पं. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार नाईक पुढे म्हणाले, ५०-५० खोक्यांसाठी व मंत्री पदांसाठी काही लोक कसे धावत गेले ते सर्वांना ज्ञात आहे. माझी ही चौथी निवडणुक आहे. एकच नेता एकच पक्ष माझा आहे. मला अनेक ऑफर आल्यात, माझ्यावर अडीच वर्ष चौकशी सुध्दा सुरू आहे. तरी सुध्दा एकही रूपयाचा भ्रष्ट्राचार माझा मिळालेला नाही. मी आजही सांगतो, माझा एक रूपयाचा भ्रष्ट्राचार असेल त्यावेळी मला फासावर लटकवा. कारण मी सर्व सामान्य लोकांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. जनतेच्या ताकदीवर अनेक प्रसंगांना तोंड दिलेलं आहे. भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे गेल्या अडीच वर्षात सरकारच्या माध्यमातून झाली आहेत ती बाहेर काढण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत, असेही नाईक म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा भ्रष्ट्राचार बाहेर काढला म्हणुन विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत. वैभव नाईक यांनी विकास केलेला नाही, मी ताकदीने सांगतोय या दोन्ही मतदार संघामध्ये तुलना करा. माझ्या कुडाळ मतदार संघात प्रामाणिक भ्रष्ट्राचार मुक्त विकास झाला. कणकवलीच्या आमदारांच्या मतदार संघामध्ये कोल्हापुरला जाणारा रस्ता गेली दोन वर्ष बंद आहे. भ्रष्ट्राचार करून रस्त्याची १०० कोटी रुपयांची कामे रखडून ठेवायची हे त्यांचे उद्योग आहेत. सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर दरवर्षी सांगत आहेत आपण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल काढत आहोत. पण आमच्या मतदार संघात महिला रूग्णालय उभ राहिलं, शासकीय मेडिकल कॉलेज सुध्दा उभ राहिलयं आणि विरोधी मंडळी केवळ आश्वासन देत आहेत. नारायण राणे म्हणतात की मी गेल्या दहा वर्षात काय केल? मी आज आमदार म्हणुन तुमच्या समोर आहे. राणेंच्या दोन्ही मुलांना आमदारकी कशासाठी पाहिजे? आम्ही सामान्य कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी वाटलेले पैसे भ्रष्ट्राचाराचे होते. छत्रपतींचा पुतळा, रस्ते या सर्व भ्रष्ट्राचारातील पैसे त्या निवडणुकीत वाटले गेले, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page