मालवण : (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून मतदार जनजागृतीसाठी आज मालवण नगरपालिकेतर्फे मालवण शहरातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. नगरपालिकेच्या अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह प्रशासकीय कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
विधानसभा निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी आणि निवडणुकीत माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रबोधन करून मतदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अनिल पाटील (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून मालवण नगरपरिषद क्षेत्रात ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. २० नोव्हेंबर रोजी २६९- कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे या मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, निवासी नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप खाडे, वाहतूक नियंत्रण पोलिस गुरुप्रसाद परब, मातृत्व आधार फाउंडेशनचे दादा वेंगुर्लेकर यांच्यासह यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवा मतदार, महिला मतदार, व नागरिक सहभागी झाले होते.
