वेंगुर्ले व तळाशील समुद्रात हायस्पीड ट्रॉलर्स व मिनी पर्ससीनचा धुमाकूळ…

आक्रमक पारंपारिक मच्छिमारांची मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक..

मालवण (प्रतिनिधी)

वेंगुर्ला तसेच तळाशील, आचरा परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचा मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरु असून बेकायदेशीर मिनी पर्ससीन मासेमारीही होत असून यामुळे स्थानिक पारंपारिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याबाबत आज आक्रमक बनलेल्या वेंगुर्ला, मालवण व तळाशील येथील पारंपारिक मच्छिमारांनी श्रमिक मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मत्स्य विभागाच्या कारवाईपूर्वी मत्स्य विभागातीलच काही लोक पर्ससीन मच्छिमारांना माहिती देत असल्याने पर्ससीन नौका पळून जातात असा गंभीर आरोप यावेळी मच्छिमारांनी करत अनधिकृत पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई झालीच पाहिजे, समुद्रात करावाई करणे जमत नसेल तर किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या विनापरवाना पर्ससीन नौकांची तपासणी करून नोटीसा बजवावी, अशी जोरदार मागणी केली.

दरम्यान, यावर सहायक मत्स्य आयुक्त सागर कुसवेकर यांनी वेंगुर्ला व आचरा समुद्रात गस्तीनौकेची गस्त वाढविण्यात येईल तसेच किनाऱ्यावर पर्ससीन नौकांची तपासणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.

वेंगुर्ला तसेच तळाशीलच्या समुद्रात मिनी पर्ससीन नौका तसेच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स किनाऱ्यालगतच्या समुद्रात येऊन मासेमारी करत असून याबाबत मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पारंपारिक मच्छिमारांनी आज मत्स्य विभाग कार्यालयात धडक दिली. यावेळी मच्छिमार नेते बाबी जोगी, दिलीप घारे, वेंगुर्ला येथील धी मूठ उभादांडा मच्छिमार सहकारी सोसायटीचे सचिव उमेश तांडेल, उपाध्यक्ष शामसुंदर रेवंडकर, सन्मेष परब, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, संजय केळूसकर, हेमंत मोंडकर यांसह मालवण, वेंगुर्ला, तळाशील, आचरा येथील बहुसंख्य मच्छिमार उपस्थित होते.

वेंगुर्ला समुद्रात रापण व इतर पारंपारिक मच्छिमारीच्या जलधी क्षेत्रात मिनी पर्ससीन मासेमारी होत आहे. तसेच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सकडून समुद्रात पारंपारिक मच्छिमारांची जाळी तोडली जात असल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे, यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे, किनाऱ्यालगत येऊन बेकायदेशीर मासेमारी सुरु असताना मत्स्य व्यवसाय विभाग कारवाई का करत नाही ? असा सवाल यावेळी उमेश तांडेल यांनी विचारला.

यावेळी बाबी जोगी यांनी आक्रमक भूमिका घेत मत्स्य परवाना अधिकारी हे केवक सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात असतानाच कारवाई करतात, आयुक्त नसताना ते कारवाई का करत नाहीत? असा सवाल केला. शेकडोच्या संख्येने परप्रांतीय नौका येत असताना मत्स्य विभागाला कारवाई जमत नसेल तर कारवाईसाठी पारंपारिक मच्छिमारांना सोबत न्या, गस्तीनौका येण्यापूर्वी पर्ससीन नौका पळून कशा जातात, गस्ती नौकेतील मत्स्य विभागाचे कर्मचारीच त्यांना माहिती देतात, असा आरोप बाबी जोगी यांनी केला. कारवाईला जाण्यापूर्वी गस्ती नौकेवरील सागरी सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांचे मोबाईल आयुक्तानी आपल्याकडे ठेवावेत, अशी मागणीही बाबी जोगी यांनी केली.

मत्स्य विभागाच्या गस्तीनौकचा वेग कमी आहे. त्यामुळे समुद्रात कारवाई करणे जमत नसेल तर किनाऱ्यावर असलेल्या नौकांची तपासणी करून ज्या नौकांवर विनापरवाना पर्ससीन जाळी व पर्ससीन मासेमारीचे इतर साहित्य दिसून येईल अशा नौकांना नोटीसा बजावण्यात याव्यात, असेही बाबी जोगी यांनी सांगितले. दिलीप घारे यांनी मत्स्य विभागात रिक्त पदांची संख्या जास्त असून पदे भरली जावीत, मच्छिमार आपल्या पोटाच्या खळगी साठी भांडत असून मत्स्य विभागाने याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगितले.

यावर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुसवेकर यांनी दोन दिवस वेंगुर्ला व दोन दिवस आचरा समुद्रात याप्रमाणे गस्तीनौकेची गस्त वाढविण्यात येईल. तसेच किनाऱ्यावर नौकांची तपासणी करून विनापरवाना पर्ससीन नौकांना नोटीस बजावण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी मत्स्य विभाग अधिकारी श्री. अलगिरी, परवाना अधिकारी मुरारी भालेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page