सावंतवाडीत महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीने धसका…?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतराला पेव:राजकीय गणिते लागलीत बदलायला..

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सद्या राजकारण्याचे केंद्र बिंदू ठरत असून, वेगवेगळे डावपेच पहायला मिळत आहेत. या मतदारसंघात अनेक चेहरे इच्छुक असून, आपल्या परीने आप आपल्या पक्षाकडे जोर लावताना दिसत आहेत. महायुती मधून शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील मित्र पक्षाचे नेते राजन तेली यांनी नाराजी व्यक्त करत थेट वेगळी वाट धरली आणि ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले होत त्यांनी तेथून या मतदारसंघात उमेदवारी मिळवली आहे. तर भाजप मधील आणखी इच्छुक चेहऱ्यांपैकी युवा नेते विशाल परब हे महायुतीत बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

तर भाजपचे पूर्वीचे नेते संजू परब यांनी, कुडाळ मालवण मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आपण दीपक केसरकर यांना विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आज जाहीर केले. तर शिवसेना पक्ष फुटीनंतर ठाकरे गटासोबत राहिलेले रुपेश राऊळ आणि बाळा गावडे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते. परंतु, राजन तेली यांना उमेदवारी जाहीर झाल्याने दोन्ही नेते नाराज होते. परंतु, रुपेश राऊळ यांची नाराजगी दूर करण्यात पक्षातील प्रमुख नेत्यांना यश आले आहे. तर बाळा गावडे बाबत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मित्र पक्षानी देखील या मतदारसंघात आपला दावा सांगितला असून, राष्ट्रवादी काँग्रेस कडून या मतदार संघात गेल्या अडीच वर्षांपासून, अर्चना घारे परब यांचे नाव चर्चेत होते. परंतु, राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने आणि हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आल्याने त्या देखील नाराज असून, महाविकास आघाडीत बंड करण्याच्या तयारीत असून अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले बबन साळगावकर देखील नाराज असल्याचे त्यांच्या आजच्या व्हाट्सअप स्टेटस वरून दिसून येत आहे. आज त्यांनी ” विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती” असा स्टेटस लावत राष्ट्रवादी शरद पवार गट मधील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नसल्याचे अधोरेखित करत असल्याचे दिसत आहे. कदाचित ते देखील वेगळी वाट धरत आपल्या स्वगृही म्हणजेच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर काँग्रेस कडून देखील अनेक जण इच्छुक असून, उमेदवारी न मिळाल्याने कोणी बंडखोरी करणार आहे का…? याबाबत अद्याप तरी स्पष्ट झाले नसून, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता सद्या तरी दिसत आहे. महायुती व महाविकास आघाडी मध्ये झालेले हे बंड नक्की कोणासाठी उपयोगी ठरेल व कोणाची डोकेदुखी वाढवेल हे येणारा काळच ठरवणार आहे.

You cannot copy content of this page