सामान्य लोक पाठीशी असतील तर कोणत्याही शक्तीही पराभव…

आम. वैभव नाईक:शक्तिप्रदर्शन करत आमदार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल;आमदार वैभव नाईक यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कुडाळ : सामान्य लोक पाठीशी असले कि कुठल्याही शक्तीचा पराभव होऊ शकतो हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. अर्ज भरण्यासाठी कोणाला बोलवावे लागलॆ नाही. सगळे स्वतःहून आले हीच आमच्या निष्ठेची पावती असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आज विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुडाळमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची कुडाळ शहरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेला आमदार वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनतर ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत रॅलीने जात आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी वीरसिंग वसावे आणि वर्षा झालटे उपस्थित होत्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पहिल्याच यादीत कुडाळ मधून उमेदवारी जाहीर झाली आणि आमदार वैभव नाईक यांनी लगेचच आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यासाठी कुडाळ मालवण मतदार संघातून गावागावातून कार्यकर्ते, सामान्य नागरिक दाखल झाले होते. अंनत मुक्ताई समोरच्या मैदानावर जाहीर सभा झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल पथक, डीजेवर लागणारी जोशपूर्ण गीत यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण झाल्याचं पाहायला मिळाले. उघड्या गाडीवर उभे राहून मतदारांना अभिवादन करत आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कूच केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महाविकास आघाडीचे परशुराम उपरकर, अमित सामंत, इर्शाद शेख, अभय शिरसाट आमदार वैभव नाईक यांच्यासोबत होते.
कुडाळ तहसील कार्यालयाकडे रॅली आल्यावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी रॅली अडविली. त्यांनतर फक्त पाच जणांनाच उमेदवारी अर्ज भरताना हजर राहण्यास परवानगी असल्याने आमदार वैभव नाईक यांच्यासह परशुराम उपरकर, अमित सामंत, अभय शिरसाट आदी अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या दालनात उपस्थित होते.
त्यांनतर वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि आज अर्ज भरताना आम्ही कोणाला बोलावलं नव्हते. लोक उत्स्फूर्तपणे आली. उलट काल मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या पक्षप्रवेशावेळी नारायण राणेंना लोकांना जाऊ नका थांबा, असे आवाहन करावे लागत होते. हाच महाविकास आघाडी आणि महायुतीतील फरक आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे. कारण माझ्या पाठीशी सामान्य जनता आहे. कालच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात बोलून गेले पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काय केलं हे मात्र त्यांनी सांगितले नाही. पुतळा भ्रष्टाचारात कोणाला अटक केली. कोण गुन्हेगार आहे याविषयी ते काही बोलले नाहीत. परंतु सामान्य लोक पाठीशी असले कि कुठल्याही शक्तीचा पराभव होऊ शकतो हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. अर्ज भरण्यासाठी कोणाला बोलवावे लागलॆ नाही. सगळे स्वतःहून आले हीच आमच्या निष्ठेची पावती असल्याचे आमदार वैभव नाईक शेवटी म्हणाले.

You cannot copy content of this page