मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले.
मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या उंच उडी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरच्या अमृता गणेश बागवे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये ईशा गणेश सुर्वे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये मुलांच्या गोळा फेक स्पर्धेमध्ये शुभम बाबाजी हडकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. ओझर विद्यामंदिरचे हे यशस्वी विद्यार्थी डेरवण- रत्नागिरी येथे दिनांक १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रवीण पारकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ओझर विद्यामंदिरचे संस्था अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, चिटणीस जी. एस. परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, त्याचप्रमाणे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
