५५ नागरिकांनी घेतला लाभ; एका रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याचे डॉ. जयश्री केसरे यांचे आश्वासन..

⚡बांदा ता.१९-: शेर्ले आरोसबागवाडी येथे बांदेश्वर आय हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचा परिसरातील ५५ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचे आश्वासन बांदेश्वर आय हॉस्पिटलच्या डॉ. जयश्री केसरे यांनी दिले. सत्यवान काळसेकर यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, आरोसबागवाडी येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांची मोफत नेत्रतपासणी, ईसीजी तसेच रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. मधुमेह व रक्तदाबामुळे डोळ्यांच्या पडद्यावर होणाऱ्या आजारांची तपासणी करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री केसरे यांनी, डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित नेत्रतपासणी करणे आवश्यक असून, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले. अनेकदा डोळ्यांच्या आजारांची सुरुवातीची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नाहीत. त्यामुळे वेळेवर तपासणी केल्यास आजाराचे निदान होऊन योग्य उपचार करणे शक्य होते. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, यासाठी पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नेत्रपटलावरील आजारांवरील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होऊ शकतात. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २० टक्के सवलत आणि फायबर चष्मा ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्याची सुविधाही रुग्णांसाठी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मूत्रपिंड, प्रोस्टेट व इतर संबंधित आजारांवरील उपचारांसाठीही पात्र लाभार्थ्यांना योजनेंतर्गत सुविधा मिळू शकतात.
या शिबिराच्या आयोजनासाठी सत्यवान काळसेकर यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी डॉ. जयश्री केसरे, सीताली वाळके, नयन म्हात्रे, स्वप्नाली जाधव, वेदिका नाईक, तुषार बिबवणेकर, पत्रकार नीलेश मोरजकर, मानकरी पांडुरंग नाईक, महेश मिशाळ, संजीवन परब, बांदा विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय चांदेकर, ग्रामपंचायत सदस्या चैतन्या चांदेकर, प्रदीप वाळके, सोनाली धुरी, दयानंद बांदेकर, अनंत बांदेकर, संगम परब, पियुष धुरी, मुख्याध्यापक प्रल्हाद जाधव, न्हानू काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ जयश्री केसरे व निर्भीड पत्रकार पुरस्कारप्राप्त पत्रकार नीलेश मोरजकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले.
