Headlines

तिथवली क्रिकेट असोसिएशनचा शैक्षणिक उपक्रम; छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिरला दोन संगणक संच भेट…

⚡वैभववाडी ता.१९-: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना संगणक शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने तिथवली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर, तिथवली या शाळेला दोन संगणक संच भेट देण्यात आले. असोसिएशनच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिन कुडाळकर, तिथवली केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय पाटील सर, तिथवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल हरयाण, खजिनदार सचिन इस्वलकर,,तिथवली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हरयाण, प्रसिद्ध प्रमुख विठोबा गुरव, अससोसिएशन चे सल्लागार जयराज हरयाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलजार काझी, शाळेतील शिक्षक झाटे सर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्नशील : स्वप्निल हरयाण

यावेळी तिथवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल हरयाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आम्ही याच शाळेचे विद्यार्थी असून या शाळेने आम्हाला घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे शाळेचे ऋण फेडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देणे हे आमचे कर्तव्य आहे.

तिथवली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गावासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू असून, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने दोन संगणक संच भेट देण्यात आले आहेत. यापुढेही शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शक्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

संगणक प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी : गुलजार काझी

शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलजार काझी यांनी तिथवली क्रिकेट असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या वर्षभरापासून असोसिएशन गावासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून चांगले काम करत असून, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शाळेला दिलेले संगणक संच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असे त्यांनी सांगितले.

शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या संगणकांचा लवकरच संगणक प्रयोगशाळा उभारून प्रभावीपणे वापर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, डिजिटल शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी या संगणकांचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तिथवली क्रिकेट अससोसिएशन च्या या उपक्रमा मुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल : केंद्रप्रमुख पाटील सर..
तिथवली केंद्राचे प्रमुख पाटील सर यांनी देखील अससोसिएशन च्या या कार्याचे कौतुक केले असून यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल असे नमूद करून अससोसिएशन ला त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
शाळा व्यवस्थापन समितीकडून असोसिएशनचे आभार
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिन कुडाळकर यांनी तिथवली क्रिकेट असोसिएशनच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. शाळेच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी असोसिएशनचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिन कुडाळकर यांच्या हस्ते तिथवली क्रिकेट असोसिएशनला आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तिथवली क्रिकेट असोसिएशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक विकास यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमातून गावातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page