शेतकरी रुपेश मडुरकर यांचे नुकसान…
बांदा : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ असून दररोज सायंकाळी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन होत आहे. मुसळधार परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून भात कापणीची कामे ठप्प झाली आहेत. परिपक्व झालेले कापणी योग्य भातपीक पावसामुळे जमिनीवर कोसळले असून ते गेले काही दिवस पाण्याखाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्यात कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी उशिरा प्रचंड विजांच्या कडकडाटासह मडूरा पंचक्रोशीत मुसळधार पाऊस झाला. मडुरा रेडकरवाडी येथील शेतकरी रुपेश मडूरकर यांच्या माडावर वीज कोसळून संपूर्ण माडाला उभी भेग गेली आहे. यावरून वीजेची तीव्रता लक्षात येते. तसेच लगतच्या विहिरीचा मोटर पंपाचे नुकसान झाले. त्यांच्या घरातील वायरिंगचेही काही प्रमाणात नुकसान झाले. तसेच अन्य तीन माडाची झाडेही वीजेमुळे प्रभावित झाली आहेत.
