आपले विचार स्वच्छ करण्यासाठी वाचनाची गरज महत्वाचे…

वैशाली पंडित:वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

⚡मालवण ता.१६-: वाचनाची आवड ही वाचल्याशिवाय कळत नाही. आज किती जणांच्या घरी वाचनासाठी पुस्तके आहेत हा संशोधनाचा विषय आहे. आजची शिक्षण पद्धती ही गुणांवर आधारित आहे. त्यापलीकडे जाऊन मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. आपले विचार स्वच्छ करण्यासाठी वाचनाची गरज आहे असे प्रतिपादन मालवणच्या जेष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, तसेच संस्थेचे लोकल कमिटी सचिव दशरथ कवटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, सौ. संजना सारंग, कु. पूजा कुडाळकर, सौ. मनीषा इंगळे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी कुडाळकर मॅडम यांनी प्रास्ताविक केले. तर परिचय सारंग मॅडम यांनी करून दिला.

यावेळी साहित्यिका वैशाली पंडित म्हणाल्या आज वाचनाची चळवळ निर्माण झाली पाहिजे हे म्हणणेच एक शोकांतिका आहे. आज मुले वाचत नाहीत म्हणून मुलांना दोष देऊन उपयोग नाही, मुळात आपण का बदलत गेलो, आपणच कमी वाचायला का लागलो याचा विचार आपल्या पिढीने केला पाहिजे, मुलांना वाचनाकडे वळविण्यासाठी आपण काय करतो हे महत्वाचे आहे. वाचाल तर वाचाल हा सुविचार केवळ म्हणून उपयोग नाही, तर आपल्याला कशापासून वाचायचे आहे हे समजून घेतल्यास वाचनाचे महत्व आपल्याला समजेल. वाचनाची चळवळ हे केवळ बोलण्यापुरते न ठेवता या चळवळीत आपण सहभागी झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या

यावेळी वैशाली पंडित यांचा चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊनं सत्कार करण्यात आला. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रंथालयाची सर्वाधिक पुस्तके वाचणारी विद्यार्थिनीं सानिका चव्हाण तसेच विद्यार्थी आदित्य चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिका वैशाली पंडित यांची विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले.

You cannot copy content of this page