जावेद खतीब: दिवाळी सणच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट…
बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे कापणीयोग्य झालेले भात पावसात भिजून कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तळकोकणात भातपीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. दिवाळी सण तोंडावर आला असून त्यात अवकाळी पावसाने कहर केल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी केली आहे.
यासंदर्भात लवकरच तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देणार असल्याचे श्री खतीब यांनी सांगितले. श्री खतीब यांनी सांगितले की, पीक विमा योजनेचे प्रस्ताव मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत तात्काळ करून घेऊन शासन दरबारी सादर करावेत. जेणेकरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणे सोपे होईल. अवकाळी पावसाचे संकट अद्याप असून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रसंगी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे खतीब यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची नोंद तात्काळ कृषी व तलाठी कार्यालय यांच्याकडे करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.
फोटो :-
जावेद खतीब.
