भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर यांचे प्रतिपादन…
वैभववाडी प्रतिनिधी
भगवान बुध्दाची धम्मक्रांती ही रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती असून धम्मचक्र गतिमान करायचे असेल तर तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा ही बौद्धांची आचारसंहिता आहे. आपले शिलाचरण हीच आपली ओळख बनली पाहिजे. गावागावात होत असलेली बुद्ध विहारे ही परिवर्तनवादी विचारांची, सामाजिक क्रांतीची केंद्रे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर यांनी केले.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने आयोजित 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरकुळकर बोलत होते. यावेळी विचारमंचावर वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, सचिव रविंद्र पवार,कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, सुवर्णा यादव, संजीवनी जाधव, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हरकुळकर पुढे म्हणाले, बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करून त्यांचे तत्त्वज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्याचा प्रचार करणे सर्वांची मोठी जबाबदारी आहे. धम्मक्रांती गतिमान करायची असेल तर प्रत्येक रविवारी बुद्धविहारात एकत्र जमले पाहिजे. समाजातील रंजल्या गांजल्या लोकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आज संपूर्ण जग अशांत असून त्याला केवळ बुद्धविचारच तारू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती शिल्पास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तालुका संघाचे बौद्धाचार्य संतोष कदम, महेंद्र यादव सुरेंद्र साळुंखे मंगेश कांबळे, अभय कांबळे यांनी विधी संचलन केले.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील बी.एच.एम्.एस. पदवी संपादित केलेल्या स्नेहल रवींद्र पवार यांचा तसेच नूतन पोलीस पाटील म्हणून नियुक्त झालेल्या बौध्द समाजातील रुपेश कांबळे, आदित्य कांबळे,अक्षता जंगम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र पवार यांनी तर सूत्रसंचालन शरद कांबळे, प्रफुल्ल जाधव यांनी केले. आभार मारुती कांबळे यांनी मानले.
यावेळी संजय जंगम, अजित कदम, सुरेश जाधव, संतोष जाधव, कृष्णा कांबळे, प्रीतम जाधव, सुहास जाधव, सखाराम तांबे, अमृत जंगम, आकांक्षा जाधव, उर्मिला जाधव आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
