अन्वय प्रभू:पर्यटन महासंघ भाजपची बी टीम असल्याचीही केली टीका..
मालवण : (प्रतिनिधी)
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला, त्यावेळी पर्यटन महासंघाने आपली याबाबतची भूमिका तटस्थपणे स्पष्ट करणे आवश्यक होते. परंतु भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या या पुतळ्याच्या कामाचे भाजपने श्रेय घेतले असल्याकारणाने पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मौन राहणे पसंत केले. त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळ्याची जागा पर्यटकांसाठी खुली करण्यात यावी, अशी पर्यटन महासंघाची मागणी हास्यास्पद असल्याची टीका मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
अन्वय प्रभू म्हणाले, मालवण येथे भारतीय नौदलाने राजकोट किल्ल्याची पुनर्बाधणी व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित केले, या निर्णयाचा तमाम मालवण वासियांनी व शिवप्रेमींनी स्वागत केले होते. परंतु त्यानंतर दुर्दैवाने भाजपच्या काही नेत्यांनी या कामाचे श्रेय घेत त्यात हस्तक्षेप केला. परिणामी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्दैवी घटनेच्या विरोधात मालवणात शिवप्रेमींमधून तीव्र पडसाद उमटले. या जनआंदोलनात मालवण मधील शिवप्रेमी सहभागी झाला होता. राजकोट किल्ल्याची पुनर्बाधणी व तेथे छत्रपतींचा पुतळा उभा राहिल्यानंतर मालवणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत व त्यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा मालवणच्या पर्यटनाचा मानबिंदू बनला होता. असा पुतळा अल्पावधीतच कोसळल्यानंतर मालवणच्या पर्यटनाचे पालकत्व म्हणवून घेणाऱ्या पर्यटन महासंघा कडून प्रतिक्रियेची अपेक्षा होती. परंतु या दुर्दैवी घटनेनंतर उभ्या राहिलेल्या जन आंदोलनात पर्यटन महासंघाने शिवप्रेमींच्या बाजूने उभे राहणे आवश्यक होते. राजकीय भूमिका बाजूला ठेवून एक शिवप्रेमी म्हणून व पर्यटन व्यावसायिक म्हणून पर्यटन महासंघाच्या वतीने तटस्थपणे बाबा मोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते. परंतु ते या विषयात सोयीस्करपणे गप्प राहिले. पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर हे मालवण भाजपाचे शहर अध्यक्षपदी कार्यरत आहेत. याच कारणामुळे त्यांनी पर्यटन महासंघाला भाजपच्या दावणीला बांधले असून आज पर्यटन महासंघ भाजपची बी टीम आहे, अशी टीका अन्वय प्रभू यांनी केली आहे.
