माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे आयोजन..
बांदा/प्रतिनिधी
माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत व सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने इन्सुली येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात सानिका नाईक (भोसले इंटरनॅशनल स्कुल, सावंतवाडी) तर आठवी ते दहावी गटात माधुरी राऊळ (कलंबिस्त हायस्कुल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक समृद्धी देसाई (डेगवे हायस्कूल), तृतीय क्रमांक मीरा आपटे (विद्यामंदिर कनेडी, ता. कणकवली) यांनी मिळविला. तर उत्तेजनार्थ प्रथम चिन्मय कोटणीस (कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), उत्तेजनार्थ द्वितीय कृष्णा पालव (जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर ४) यांना देण्यात आला. आठवी ते दहावी गटात द्वितीय क्रमांक मृदुला सावंत (दिव्य ज्योती स्कुल, डेगवे-बांदा), तृतीय क्रमांक रिया धुरी (बॅरिस्टर नाथ पै कुडाळ) यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ प्रथम श्रावणी आरोंदेकर (कुडाळ हायस्कुल), द्वितीय प्रणाली घाटकर (आरपीडी हायस्कुल सावंतवाडी) यांना देण्यात आला.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री कामत म्हणाले, अध्यापक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे आपण विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला अशा वक्तृत्व स्पर्धेतून प्रेरणा व प्रोत्साहन देऊन शैक्षणिक स्तर उंचावण्याचे फार मोठे मौलिक कार्य करत आहात. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश सुखी, प्रमुख अतिथी अजय शिंदे, गुरुनाथ पेडणेकर, काष्ट्राइब संघटना अध्यक्ष संजय पेंडुरकर, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, भाऊसाहेब चौरे, दिगंबर मोर्ये, संजय शेवाळे, वासुदेव हळदणकर-सावंत, मधुकर देसाई, आत्माराम गावडे, विनेश गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिकांचे वितरण माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, गुरुनाथ पेडणेकर, विनोद गावकर, दिगंबर मोर्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला मोठ्या गटातून २५ व लहान गटात ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. निवृत्ती कार्वेकर, सौ. सीमा मोरजकर, सौ. गौरवी पेडणेकर, गुरुनाथ नार्वेकर यांनी काम केले. प्रास्ताविक दिगंबर मोर्ये यांनी केले. सूत्रसंचालन सुविधा पालव यांनी केले. आभार संजय शेवाळे यांनी मानले.
