कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने होतकरू डॉक्टरने गमावले प्राण:उद्या होणार होता नवीन कामावर रुजू ..
कुडाळ : आकेरी घाटात शनिवारी रात्री मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी-आंबेडकरनगर येथील किशन केशव पिगुळकर (वय-21 वर्षे) याचा मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला त्याचा शेजारी श्रीराम पांडुरंग केळुसकर हा जखमी झाला आहे. दरम्यान पुढील उपचारासाठी किशन पिंगुळकर याला गोवा बांबुळी येथे हलविण्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज असताताना एकही ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यामुळे व्हेटर्नरी डॉक्टर झालेल्या या युवकाला आपले प्रमाण गमवावे लागले. याबद्दल चीड व्यक्त होत आहे.
अपघाताबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आकेरी येथे जुनी कोका कोला कंपनी समोरच्या रस्त्यावर उताराच्या ठिकाणी हा अपघात रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमाराला घडला. मयत किशन केशव पिंगुळकर हा आपला शेजारी श्रीराम पांडुरंग केळुस्कर यांच्यासह कोलगाव-सावंतवाडी येथून आपली मोटारसायकल (क्र .MH-O7-AE-2019) वरून पिंगुळीला आपल्या घरी जात असताना. आकेरी घाटात त्याची मोटारसायकल स्लिप होऊन मोटार सायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अत्यवस्थ असलेल्या किशनला आणि जखमी झालेल्या श्रीराम याना सावंतवाडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पण किशन खूप अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे हलवायचे होते. त्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज होती. पण जिल्हयातील दोन्ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहाटे चार वाजता किशन केशव पिंगुळकर य याची प्राणज्योत मालवली.
या अपघाताची खबर पिंगुळी येथील देवेंद्र पिंगुळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रवींद्र भांड अधिक तपस करत आहेत.
दरम्यान किशन हा नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झाला होता. पिंगुळी येथे शोकाकुल वातावरणात आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू असा परिवार आहे. किशन हा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव उर्फ बंड्या पिंगुळकर यांचा मुलगा होता. किशनच्या अपघाती मृयूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
