मालवण, दि प्रतिनिधी
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून २७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता चैतन्य हॉटेल समोरील मालवण हेरिटेज येथे पर्यटन सेना स्थापना करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू यांनी दिली.
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून आंबोली येथील व्हिसिलिंग वूडस् संचालक फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले, प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सुरेखा वाळके, जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे आदी उपस्थित राहणार आहेत. या पर्यटन सेनेमध्ये पर्यटन व्यवसायिक पर्यटन क्षेत्रामधील तज्ञ आणि डॉक्टर, वकील यांसारख्या बुद्धिजीवी लोकांना सामावून घेतले जाणार आहे. सध्या खूप पर्यटन संस्था कार्यरत आहेत. परंतु स्थानिक पातळीवर कोणतेही काम केले जात नाही. त्यामुळे आपले प्रश्न सुटत नाहीत. या पार्श्वभूमीवरच या पर्यटन सेनेची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती श्री. प्रभू यांनी दिली. या कार्यक्रमास पर्यटन व्यावसायिकांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
