पालकमंत्री रवींद्र चव्हाण: आजच्या जनता दरभरात 348 अर्जांचा समावेश.
⚡ओरोस ता २६-: १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कुडाळ मालवण विधानसभेच्या जनता दरबारात ६४५ तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ५५० अर्ज निकाली काढले गेलेले आहेत. अशाप्रकारे चांगले काम करून जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र ठरलेले आहेत. त्यांच्या कामामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान, आज झालेल्या जनता दरबारात नव्याने ३४८ अर्ज दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी स्वतंत्र जनता दरबार घेण्यास ऑगस्ट महिन्यात सुरुवात केली होती. याचा दुसरा टप्पा २५ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आला आहे. बुधवारी कणकवली विधानसभेसाठी जनता दरबार पार पडल्यानंतर आज कुडाळ मालवण विधानसभेसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्यासह शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनरक्षक नवल किशोर रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक सावंत आदी उपस्थित होते.
