शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर प्रकल्पाचे झाले सादरीकरण..
ओरोस ता २६
राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजिक पर्यटनासाठी आरक्षित असलेल्या जागेत “ऊर्जा हिंदुत्वाची” या नावाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पात काय असणार याचे सादरीकरण आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर करण्यात आले असून उच्चस्तरीय समितीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे लवकरच याबाबत सादरीकरण करून मान्यता घेतली जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात गुरुवारी कुडाळ मालवण विधानसभेसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर मंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचे आर्किटेक्ट अमित कामात यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात येत आहे तेथे एकूण शासकीय मालकीची सव्वा सहा एकर जागा आहे. हि जागा पर्यटन विकास, गार्डन आणि वाहने पार्किंग यासाठी आरक्षित आहे. मालवण नगर परिषदेच्या ताब्यात ही जमीन आहे. त्यामुळे प्रकल्प उभा करण्यासाठी जागेची अडचण येणार नाही, असे सांगितले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील व अन्य उपस्थित अधिकाऱ्यांनीही हे सादरीकरण पाहिले.
