वाचकार्पण सोहळ्यात मान्यवरांनी काढले कौतुकोद्गार.
⚡मालवण ता.१५-: आपली संस्कृती जपत आणि दुसऱ्यांच्या संस्कृतीचा मान ठेवत लिहिलेली सुक्या सुंगटाची कढी ही मालवणी भाषेतील पहिली कादंबरी मालवणी साहित्यातील एक नवा अविष्कार आहे. ही कादंबरी मालवणीतून लिहिणे हे एक आव्हान असले तरी ती वाचनास अतिशय सुलभ आहे, त्यातूनच लेखक सुयोग पंडित यांचे लेखन कौशल्य दिसून येते. सुयोग पंडित यांनी मालवणी भाषेत लिहिलेल्या या कादंबरीने इतर मालवणी साहित्यिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुकोद्गार यां कादंबरीच्या वाचकार्पण सोहळ्यात मान्यवरांनी काढले.
मालवण मधील लेखक सुयोग पंडित यांनी लिहिलेल्या ‘सुक्या सुंगटाची कढी’ ह्या मालवणी कादंबरीचा वाचकार्पण सोहळा उद्योजक व साहित्यिक रुजारीओ पिंटो आणि माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण भरड येथील शिवाजी वाचन मंदिरात संपन्न झाला.
प्रारंभी संजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तर या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक साहित्यिका वैशाली पंडित व नझ़िरा शेख़ यांनी मान्यवरांचे श्रीफळ व भेटवस्तू देत सत्कार केला
यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वयंपाकाच्या हंडीमधून सुक्या सुंगटाची कढी या कादंबरीच्या प्रती बाहेर काढून अनोख्या पद्धतीने कादंबरीचे प्रकाशन तथा वाचकार्पण करण्यात आले. यावेळी लेखक सुयोग पंडित यांनी या कादंबरीच्या लेखना दरम्यानचे अनुभव सांगितले आणि त्यांच्या लेखनाला प्रेरक ठरलेल्या साहित्यिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर मान्यवर श्री. रुजारीओ पिंटो यांनी कादंबरीचे रसग्रहण करून मालवणी लेखन ही जबाबदारी समजून सुयोग पंडित यांनी आपले अष्टपैलूत्व योग्य मार्गाने जपून यापुढे लेखन करावे, असे सांगितले. तर नितीन वाळके यांनी आजच्या काळामध्ये सुक्या सुंगटाची कढी ही कादंबरी लिहिणे व ती छापून आणत वाचकांसमोर ठेवणे हे लेखक सुयोग पंडित यांचे प्रचंड मोठे धाडस आहे. साहित्यामध्ये कालानुरुप होणाऱ्या बदलांमध्ये सुक्या सुंगटाची कढी या कादंबरीने एक वेगळा ठसा उमटवला आहे व ती पहिली मालवणी कादंबरी आहे, असे सांगत सुयोग पंडित यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीकांत सावंत, प्रतिभा तोरसकर, सौ. अर्चना कोदे, ज्योती तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक यांनीही मनोगतातून कादंबरीला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पत्रकार विजय रावराणे, सौ. फिलोमीना पंडित, श्रीकांत सावंत, बाळू काजरेकर, विराणी कोदे , रोहिणी दिघे, दादा वेंगुर्लेकर, नंदू देसाई, ॲड. अमिया बांदेकर, शिवाजी वाचन मंदिरच्या कार्यवाह वैदेही जुवाटकर व ग्रंथपाल मानसी दुदवडकर व मालवण मधील साहित्यप्रेमी उपस्थित होते. सहिष्णू पंडित यांनी आभार मानले. शिक्षक व कीर्तनकार महेश धामापूरकर यांनी ‘अक्षर प्रार्थना पसायदान’ सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
