⚡मालवण ता.१२-:
मालवण तालुक्यातील पळसंब – बुधवळे रस्त्यावर गोवा-२ प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक रस्त्याच्या साईडपट्टी वरून लगतच्या शेतात पलटी झाल्याची घटना काल रात्री घडली. सुदैवाने वाहन चालक बचावला असला तरी ट्रक शेतीत पलटी झाल्याने नाचणी, कणगी शेतीचे नुकसान झाले. याबाबतची माहिती ग्रामस्थांना समजताच पळसंब सरपंच, उपसरपंच, माजी सरपंचासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सुरु असलेल्या अवजड वाहतूकी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी दाखल झालेल्या आचरा पोलीसांकडे गाडीच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत झालेले शेतीचे नुकसान भरुन दिले जात नाही तोपर्यंत गाडी हलवायची नाही, असा पवित्रा घेतला होता.
बुधवळे परीसरात सुरू असलेल्या चिरे खाणींमुळे बुधवळे, पळसंब अरुंद रस्त्यावरून कायम सोळा चाकी ट्रक, डंपर वाहतूक सुरू असते. यामुळे इतर वाहनांना या भागातून प्रवास करताना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सरपंच महेश वरक यांनी सांगितले. यामुळे रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. काल रात्री दहा, साडे दहाच्या सुमारास ओव्हरलोड चिऱ्यांनी भरलेला कर्नाटक पासिंगचा ट्रक वाहतूक करत असताना गोवा- २ प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोरील दिपक आपकर यांच्या शेतात पलटी झाला. रस्त्याच्या बाजूचाही भाग कोसळल्याने रस्ता धोकादायक बनला आहे.
याबाबतची माहिती समजताच पळसंब सरपंच महेश वरक, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच अवी परब, शेतकरी दिपक आपकर, सुहास सावंत, रामकृष्ण पुजारे, श्री. परब, पिंटो सावंत, संतोष चव्हाण, अनिकेत परब, बाळा सावंत, प्रभाकर आपकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अगोदरही या भागात अपघात झाला होता. यामुळे वारंवार होणारे अपघात आणि वाहन चालकांची वाढती मुजोरगिरी यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. शेतकरी दिपक आपकर यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि या भागातून होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघून अंधाराचा फायदा घेत ट्रक चालकाने तेथून पळ काढला होता.
अपघाताची खबर मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे हवालदार सुदेश तांबे, मनोज पुजारे घटनास्थळी दाखल झाले होते. चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून केली जात होती. मात्र उशिरापर्यंत आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
गणेश उत्सवात वाहतूकीला अडथळा होवू नये म्हणुन अवजड वाहतूक बंदी असतानाही गाड्या कुणाच्या परवानगीने सुरु असतात असा प्रश्न उपस्थित करत पळसंब सरपंच महेश वरक, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी पळसंब गावातून होणारी अवजड वाहतूक बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
