कुत्र्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील दारिस्ते सुतारवाडी येथील स्वप्नाली सुतार यांच्या कुत्र्याला मारहाण करून त्यांना शिवीगाळ केल्याबद्दल तिघांवर कणकवली पोलीस ठाण्यात सुभाष मोहन देवळी (५०), सुरज सुभाष देवळी (२०) व मोहन देवळी (६५, सर्व रा. दारिस्ते सुतारवाडी) यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९.४५ वा. च्या सुमारास घडली.

स्वप्नाली सुतार व सुभाष देवळी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. गुरुवारी रात्री स्वप्नाली सुतार यांचा कुत्रा भुंकू लागल्याने शेजारी राहणारे सुभाष देवळी यांचा मुलगा सूरज देवळी याने त्या कुत्र्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत त्या कुत्र्याच्या पायाला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. त्यादरम्यान स्वप्नाली सुतार या तेथे येऊन कुत्र्याला जवळ घेतले असता सुरज देवळी यांनी त्या कुत्र्याला सोड मी त्याला ठार मारणार असे सांगितले. त्यावेळी सुभाष देवळी व मोहन देवळी हे बाहेर येऊन स्वप्नाली सुतार व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत उद्या तुझे काय करतो ते बघ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आदित तपास कणकवली पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page