मालवणात वाहनाच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू…!

⚡मालवण ता.०२-: मालवण शहरातील पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा वाहनाच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असल्याने या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मालवण पेट्रोल पंप समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी एक पुरुष मृतदेह पावणे आठ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना दिसून आला. या मृतदेहाच्या डोक्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झालेला असल्याने त्याची ओळख पटविणे मुश्किल झाले. याबाबत माहिती मिळताच मालवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार साडे सात वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून गेलेल्या एका अज्ञात बसच्या धडकेत सदर व्यक्ती खाली पडून बसच्या चाकाखाली सापडल्याने डोक्याचा चुराडा होऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सदर व्यक्तीच्या कपड्यावरून ती शहरात बेवारस फिरणारी व्यक्ती असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मुख्य आणि रहदारीच्या रस्त्यावर हा अपघात घडण्याच्या वेळी तसेच अपघात घडून बराच वेळ झाला तरी याची माहिती कोणाला न कळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page