पाचव्या श्रावण सोमवारी देखील भाविकांची कुणकेश्वर मध्ये गर्दी…

⚡देवगड ता.०२-: श्री देव कुणकेश्वर मंदिर आज पाचव्या श्रावण सोमवारची पूजा किंजवडे येथील विनय पाडावे व पडेल येथील गणेश वेतकर यांच्या हस्ते प्रथम पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले.

पाचवा श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची गर्दी ही सकाळी मोठ्या प्रमाणात होती. यावर्षी तब्बल ७१ वर्षानंतर श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती आणि यात विशेष म्हणजे जवळपास १८ वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
श्री देव कुणकेश्वराच्या श्रावण सोमवारच्या पूजेचे मान आमदार नितेश राणे, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,कुडाळ येथील चार्टर्ड अकाउंट सागर तेली व चॅरिटी ऑफिस अधीक्षक अमोल वारगुडे तर पाचव्या सोमवारची पूजा किंजवडे येथील विनय पाडावे व पडेल येथील गणेश वेतकर यांना देण्यात आला. श्री देव कुणकेश्वर श्रावण सोमवारसाठी मुंबई येथील नामांकित भजन प्रेमी मंडळी यांनी देखील कुणकेश्वरमध्ये येऊन आपली भजन कला सादर केली. यावर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी भाऊ बहीण नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण असल्यानेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सेल्फी पॉइंटची निर्मिती देखील करण्यात आली होती. कुणकेश्वर मध्ये येणाऱ्या अनेक भाविक भक्तांनी आपल्या भावाला राखी बांधून शिवतीर्थावर रक्षाबंधन सण साजरा केला.तर चौथ्या श्रावण सोमवारी कुणकेश्वर मध्ये गोकुळाष्टमी हा सण असल्यामुळे कुणकेश्वर पंचक्रोशीतील भाविकांची शिवतीर्थावर गर्दी होती.
यावर्षीच्या श्रावण सोमवार कोणत्याही भाविक भक्तांची दर्शनासाठी गैरसोय होणार नाही याची दक्षता कुणकेश्वर ग्रामपंचायत कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामस्थ यांनी घेतली होती. त्यामुळेच श्रावण सोमवारचे पाचही दिवसातील उत्सव हे भाविकांच्या गर्दीने उत्साहात संपन्न झाले. कुणकेश्वर श्रावण सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, मान्यवरांचे , एसटी , पोलीस प्रशासन यांचे श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page