छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि पुतळा निवडणुकीचे एटीएम म्हणून वापरले गेले…

आम. भास्कर जाधव:
राजकोटची आम. भास्कर जाधव यांच्याकडून पाहणी..

मालवण (प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाहीत, तर संपूर्ण जगाचा स्वाभिमान व मानबिंदू आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे,भ्रष्टाचारामुळे, बेजबाबदारपणामुळे शिवरायांचा पुतळा पडला. महाराजांचा पडलेला पुतळा पाहताना मनाला वेदना होतात, संताप येतो. सरकारकडून यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न हे निवडणुकीचे एटीएम कार्ड म्हणून वापरले गेले, त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि पुतळा निवडणुकीचे एटीएम कार्ड म्हणून कसे वापरले गेले याचे हे जिवंत उदाहरणं आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राजकोट येथे बोलताना केली.

ठाकरे शिवसेनेचे गुहाघरचे आमदार भास्कर जाधव यांनी आज मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट देऊन कोसळलेल्या शिवपुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आम. जाधव यांनी शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर नतमस्तक होऊन शिवरायांना मानवंदना दिली. तसेच कार्यकर्त्यांच्यासमवेत चौथऱ्यावर काही वेळ बसून आत्मक्लेश केला.

महाराष्ट्र सरकार नौदलावर पुतळ्याचे काम ढकलत असताना सरकारने पुतळ्याची ऑर्डर का दिली, जुन्या जाणत्या शिल्पकारांना काम देण्या ऐवजी नवख्या लोकांना का दिले. हे सर्व भ्रष्टाचारसाठी झाले असून त्यासाठी छत्रपतींचे नाव वापरण्याचे महापाप केले असून याचा फक्त निषेध करून चालणार नाही, तर अशा लोकांचा राजकीय क्षितिजावरून कडेलोट जनतेने केला पाहिजे, असेही यावेळी भास्कर जाधव म्हणाले.

तसेच पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे हा अजून पोलिसांना सापडत नाही कसा ? कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे, पालकमंत्र्यांचा पीए पटवर्धन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशी फडणवीस, आपटे आणि पटवर्धन काय लिंक आहे हे आता जनतेने शोधावे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावत फडणवीस यांच्यासारखा कुचकामी गृहमंत्री राज्याला लाभला आहे, अशी टीकाही केली.

You cannot copy content of this page