⚡मालवण ता.२९-: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर काल बुधवारी ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेल्या राड्या प्रकरणी मालवण पोलिसांनी ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
राजकोट किल्ला येथे भाजपा व ठाकरे गट पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते . या राड्या दरम्यान पोलीस कर्मचारी संभाजी पाटील, मेहेक परब हे जखमी झाले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले.
त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.
