इंग्रजी शाळांची वेळ बदलल्याने मुलांबरोबर पालकांचीही होतेय ओढाताण

शाळेच्या वेळेत सुधारणा करण्याची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी..

⚡मालवण ता.२२-:
इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वेळ सकाळी ९ ते दुपारी २. ४५ अशी बदलण्यात आल्याने मुलांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर परिणाम होत आहे. यामध्ये मुलांबरोबरच पालकांचीही ओढाताण होत आहे, त्यामुळे शाळांची वेळ बदलून ९ ते २ अशी करण्यात यावी, अशी मागणी मालवण मधील रोझरी इंग्लिश स्कुलच्या पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

इंग्रजी शाळेची वेळ बदलण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातून सकाळी ८ वाजता बाहेर पडणाऱ्या मुलांना शाळा आटोपून घरी पोहचण्यास सायंकाळी ४ ते ४. ३० वाजतात. मुलांनी सकाळी डब्यातून आणलेले जेवण दुपारपर्यंत थंड होत असल्याने मुले नीट जेवत नाहीत, जेवणाची वेळ बदलल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही लांब राहणाऱ्या पालकांना व नोकरदार पालकांना मुलांची ने – आण करताना धावपळ होत आहे. तसेच बदललेल्या वेळेमुळे मुलांना इतर स्पर्धा परीक्षाचे शिकवणी वर्ग, नृत्य कराटे आदी क्लासला जाताना ओढताण होत आहे. देवबाग, चौके, आचरा अशी लांबून मालवणात येणारी मुलेही आहेत. मालवण तालुका हा पर्यटन तालुका असल्याने पर्यटन हंगामात शाळेच्या बदललेल्या वेळेमुळे मुलांना घरी पोहचण्यास आणखी वेळ लागणार आहे, या सर्व अडचणी लक्षात घेऊन शाळेची वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी १. ३० किंवा ९ ते दुपारी २ अशी करावी, अशी मागणी पालकांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी यांना लक्ष देण्यास वेळ नाही – शिल्पा खोत

दरम्यान, इंग्रजी शाळांच्या बदललेल्या वेळेमुळे विद्यार्थी व पालकांना होणाऱ्या त्रासाबाबत ठाकरे शिवसेनेच्या मालवण कुडाळ युवतीसेना प्रमुख सौ. शिल्पा यतीन खोत यांनीही लक्ष वेधले आहे. शाळेची वेळ बदलल्यामुळे भेडसावणाऱ्या अडचणी बाबत गेला महिनाभर पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विनवणी करूनही अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. इंग्रजी शाळांच्या वेळ बदलण्याबाबत जिल्हाभरातून मागणी होत असताना जिल्ह्यातीलच शिक्षणमंत्री असलेल्या ना. दीपक केसरकर यांना लक्ष देण्यास वेळ नाही. पालकांच्या या अडचणींची त्वरित दखल घेऊन याप्रश्नी मार्ग काढण्यात यावा, असे शिल्पा खोत यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page