ऐश्वर्या काळूशे:नागरिक आणि अधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न..
⚡कुडाळ ता.२२-: येणारा गणेशोत्सव अत्यंत आनंदात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी काटेकोरपणे चांगले काम करा असे आवाहन कुडाळ-मालवणच्या उप विभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी आज केले. श्रीमती काळूशे यांच्या अध्यक्षतेखाली आज कुडाळमध्ये गोपाळकाला, गणेशोत्सव नियोजन सभा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीमध्ये कुडाळ शहर आणि तालुक्यात गणेशोत्सव साजरा करण्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
येत्या ७ सप्टेंबर पासून सर्वांचा लाडका गणेशोत्स्तव सुरु होणार आहे. त्या दृष्टीने योग्य नियोजन व्हावे यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व विभागांची आणि नागरिकांची संयुक्त बैठक मराठा समाज सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. त्या यामध्ये महसूल, नगर पंचायत, पोलीस, एसटी, महावितरण, पंचायत समिती, राष्ट्रीय महामार्ग, राज्य उत्पादन शुल्क, एमआयडीसी अशा विभागांना निमंत्रित करण्यात आले होते. सार्वजिनक बांधकाम विभाग वगळता सव विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सुरुवातीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उद्देश समजावून सांगितल्यावर सभेला विविध खात्यांप्रमाणे बैठकीला सुरुवात झाली. पहिल्यांदा नगर पंचायतीची भूमिका मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी स्पष्ट केली. त्या प्रमाणे शहरातील वाहतूक, एक दिशा मार्ग, भाजी विक्रेत्यांना नगर पंचायतीच्या पटांगणात बसू देणे, माटवीचे सामान विक्रेत्याना कुठेही बसण्याची परवानगी, शहरातून डंपर आणि अवजड वाहतूक करण्यास बंदी याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी चर्चेत काही गेल्या वर्षीच्या नियोजनाचे मुद्दे आले. भाजी विक्रेत्यांना कुठे बसवावे याबद्दल नागरिकांनी जोरदार चर्चा केली. पोलीस ठाण्यानजीक असलेल्या त्रिकोणी जागेत गेल्या वर्षी भाजी विक्रेत्यांना बसू दिल्याचा मुद्दा राकेश वर्दम यांनी मांडला त्याला बंड्या सावंत यांनी आक्षेप घेतला. भाजी विक्रेत्यांनी नेमके कुठे बसावे यावर बैठकीत बरीच चर्चा झाली.
त्यानन्तर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहील असे सांगितले. धोकादायक झाडे, वीज वाहिन्या दुरुस्त करण्यात येतील असेही ते म्हणाले. उपस्थित नागरिकांनी महावितरणचा शहरातील फोन उचलला जात नाही, तक्रर कुठे करायची, त्यामुळे आम्हाला तक्रारीसाठी एक नंबर द्या अशी मागणी केली. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी महावितरच्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विशेषतः कुडाळ शहरच्या शाखा अभियंता छाया परब यांच्या कामाचे त्यांनी वाभाडे काढले. त्या अधिकारी फोन उचलत नाहीत. आमचे सुद्धा फोन उचलत नाहीत. फोन उचलला तर नीट उत्तरे देत नाहीत. गवळदेव येथे झालेल्या दुर्घटनेत एकाचा जीव गेला होता त्यावेळी त्या केवळ महिला अधिकारी होत्या म्हणून वाचल्या नाहीतर लोकांनीच त्यांना मारले असते त्यामुळे त्यांना कार्यपद्धती सुधारायला सांगा अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता याना दिल्या.
त्याच बरोबर एसटी प्रशासनाला देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या. शहरात जो एकदिशा मार्ग होणार आहे त्याची सूचना बाहेरून येणाऱ्या चालकांना द्यावी असेही सांगण्यात आले. शहरातील पार्किंग झोन, निश्चित करण्यात आले. अंनत मुक्ताई हॉटेल समोर, दिवाणी न्यायालयासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. शहरातून होणारी डंपर वाहतूक गणेशोत्सव काळात पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शहरात आठ गणेश घाट आहेत. त्या ठिकाणी नगर पंचायतच्या वतीने साफसफाई करून लाईट आणि निर्माल्य कलशाची व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये पिंगुळी तिठ्यावर जी वाहतूक कोंडी होते तो मुद्दा सुद्धा पिंगुळी सरपंच अजय आकरेकर यांनी मांडला.
राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकणी सर्व्हिस रोड वर पाणी पडते. काही ठिकणी रास्ता लेव्हल मध्ये नाही. काही ठिकाणी पाणी साचते, लाईट बंद आहेत, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले असता अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर नागरिकांचे समाधान झाले नाही.
रिक्षा व्यावसायिकांना देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या. रिक्षा स्टॅण्डवर डबल लाईन लावायची नाही, अवाजवी भाडे आकारायचे नाही. प्रवाशांशी विनाकारण हुज्जत घालायची नाही,अशा सूचना देण्यात आल्या. त्यावर रिक्षा युनियनची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सोबत बैठक झाली आहे. त्यांनी देखील सूचना दिल्या आहेत, त्या प्रमाणे कार्यवाही होईल अशी ग्वाही रिक्षा युनियनचे श्री. शरबिद्रे यांनी दिली. गावागावातील रस्यावर जी झाडी वाढली आहे ते झाडी साफ करून घ्यावी अशी सूचना सुनील भोगटे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धनंजय जगताप याना केली.
यावेळी प्रांत अधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना लोकांना त्रास होणार नाही यादृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या. येणारा हा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने आपण साजरा करूया असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उप निरीक्षक श्री. कराडकर, नगराध्यक्ष अक्षता खटावकर, नगर पंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, महावितरणचे कार्यकारी अभियंता, एसटीचे स्थानक प्रमुख श्री. कदम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उदय थोरात व मिलिंद गरुड, हायवेचे अधिकारी, एमआयडीसीचे श्री .रेवणकर, रुपेश सारंग,श्री. कदम आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बंड्या सावंत, राकेश वर्दम, सुनील भोगटे,, प्राजक्ता बांदेकर, राजन नाईक, किरण शिंदे, संदेश पडते, चांदणी कांबळी, अजय आकेरकर, संध्या तेरसे, प्रसाद शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, अवधूत शिरसाट, निलेश परब, आदी नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला.एटीएम फोडीतील गुन्हेगाराला पकडून दिल्याबद्दल पणदूरचे पोलीस पाटील देऊ सावंत यांचा यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
