बांदिवडे साठी एसटी फेरी सुरू करा…

बांदिवडे ग्रामस्थ संघाने वेधले विभाग नियंत्रकांचे लक्ष: चतुर्थी पूर्वी फेरी चालू न झाल्यास आंदोलन..

⚡मालवण ता.२१-: कणकवली आगारातून बांदिवडेसाठी सकाळी सव्वा नऊ वाजता सुटणारी एसटी फेरी कोरोना कालावधीपासून बंद करण्यात आल्याने रेल्वेने येणारे चाकरमानी, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी आणि या मार्गांवरील गोठणे, रामगड, श्रावण, आडवली आदी गावातील ग्रामस्थ यांची गैरसोय होत
आहे याबाबत अनेकवेळा एस टी प्रशासनाचे लक्ष वेधून ही त्याकडे एस टी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेत एसटीच्या फेरी सूरु करण्याबाबत निवेदन दिले. तर गणेश चतुर्थी पूर्वी सकाळी 9.15 वाजता सुटणारी फेरी चालू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कणकवली आगारातून बांदिवडे साठी सकाळी 9.15 वा सुटणारी फेरी कोरोना कालावधीपासून बंद करण्यात आली आहे. सदर फेरी रेल्वेने येणारे चाकरमानी, ग्रामस्थ तसेच शालेय विध्यार्थ्यांना सोईची होती. या मार्गांवरील गोठणे, रामगड, श्रावण, आडवली आदी गावातील ग्रामस्थ सुद्धा या फेरीवर अवलंबून होते. सदर फेरी चालू करण्याबाबत यापूर्वी सुद्धा अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. परंतु कार्यवाही होत नसल्याने बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने विभाग नियंत्रक यांची भेट घेत याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी संघाचे अध्यक्ष श्री आनंद परब, विलास परब, बंदिवडे सोसायटी अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, उदय सावंत, चंद्रकांत परब, रंजन प्रभू, सुभाष परब , हरेश परब, सत्यवान सावंत आदी उपस्थित होते. तसेच सध्या बांदिवडे साठी दोन एसटी फेऱ्या चालू असून या दोन्ही फेऱ्या वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बांदिवडे येथून नियोजित वेळेआधी सकाळी सुटणारी फेरी पहाटे 6 वाजता सोडण्यात यावी तसेच कणकवली येथून सायंकाळी सुटणारी फेरी वेळेवर सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पहाटेची फेरी पाच मिनिटे वेळेआधीच सुटत असल्याने कणकवली येथे महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांना दुसऱ्या गाडीचा पर्याय नसल्याने शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागते. दरम्यान याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे यावेळी विभाग नियंत्रक श्री पाटील यांनी सांगितले. गणेश चतुर्थी पूर्वी सकाळी 9.15 वाजता सुटणारी फेरी चालू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page