मालवणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा सरमळकर यांचे निधन…

गोवा येथे उपचारा दरम्यान घेतला अखेरचा श्वास;सौ सरमळकर यांच्या निधनाने मालवणसह उभादांडा या माहेर गावात व्यक्त होतोय शोक

मालवण दि प्रतिनिधी मालवणच्या माजी नगराध्यक्षा आणि मालवण लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. सुरेखा राजन सरमळकर यांचे आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यू समयी त्या ६२ वर्षाच्या होत्या. मालवण शहराच्या जडणघडणीत नगराध्यक्ष म्हणून काम करताना सौ. सुरेखा सरमळकर यांनी मोलाचे योगदान दिले होते. वेंगुर्ला उभादांडा येथील साळगावकर घराण्यात जन्म घेतलेल्या सुरेखा तुकाराम साळगावकर यांचा विवाह मालवणचे राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक राजन चंद्रकांत सरमळकर यांच्याबरोबर १९८५ मध्ये झाला. समाजसेवेची आवड असणाऱ्या सौ. सुरेखा सरमळकर यांनी आपले पती राजन सरमळकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मालवण नगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक लढविली. धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या सुरेखा सरमळकर यांना लोकांनी निवडून देत मालवण नगरपालिकेत नगरसेविका म्हणून पाठविले. राजकारणात नवख्या असतानाही सरमळकर यांनी मालवणच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळताना अनेक विकासाची कामे पूर्णत्वास नेली. या कामांमध्ये मालवणच्या मोरे डिस्पेन्सरीचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यामध्ये सौ. सरमळकर यांचा मोलाचा वाटा आहे. नगराध्यक्ष पदाच्या काळात सौ. सरमळकर यांनी मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहाचे भूमिपूजनही केले होते. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून सौ. सरमळकर यांनी नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या काळात अनेक धडाडीचे निर्णय घेतले. आपले पती तत्कालीन नगरसेवक राजन सरमळकर यांच्या बरोबरच नगरपालिकेतील आपल्या पक्षाच्या इतर नगरसेवकांना विश्वासात घेत सौ. सरमळकर यांनी विविध विकासकामे पूर्णत्वास नेली. शासकीय निधी खर्च करतानाच प्रसंगी स्वतःची पदरमोड करीत सुरेखा सरमळकर यांनी मालवण धुरीवाडा भागातील नळपाणी योजना, राजकोट नळपाणी योजना पूर्णत्वास नेल्या होत्या. विशेष म्हणजे आडारी येथील गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता तत्कालीन नगरसेवक अशोक तोडणकर यांच्या सहकार्याने पूर्ण केला होता. नागरिकांना मूलभूत सेवा देण्यास सौ. सुरेखा सरमळकर या नेहमीच आघाडी वर राहिल्या होत्या. राजकीय संघर्षातही त्यांनी नगराध्यक्ष पदाचा आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. मालवण लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते . अलीकडच्या काही महिन्यात सौ. सुरेखा सरमळकर यांना प्रदीर्घ आजाराने गाठले होते. सिंधुदुर्गात उपचार झाल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले होते. आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक राजन सरमळकर, सासरे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page