सुदेश आचरेकर: येणाऱ्या निवडणुकीत आमदार वैभव नाईकांना कुडाळ मालवणातील जनता जागा दाखवणार..
⚡मालवण ता.१७-: ठाकरे शिवसेनेच्या आमदार, माजी खासदार आणि आता शहर मर्यादित असलेल्या नवीन नेत्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या जनता दरबारावर टीका करण्यापूर्वी गेली दहा वर्षे स्वतः जनतेसाठी कोणती विकासकामे मार्गी लावली याचे उत्तर द्यावे आणि मगच जनता दरबारात पालकमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याने विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. गेली दहा वर्षे खासदार अगर आमदार यांनी जनता दरबार घेण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने आता सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे मंदार केणी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार वैभव नाईक चाप ओढत आहे. या आमदारांना या निवडणुकीत जनता जागा दाखवून देणार आहे, असा टोला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर टिका केल्याने माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केणी यांच्या टिकेचा समाचार घेतला. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, दिपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज पेडणेकर, जगदीश गावकर, नंदू देसाई, राजा मांजरेकर, ललीत चव्हाण, विलास मुणगेकर, पंकज पेडणेकर, कमलेश कोचरेकर, आबा हडकर, भाऊ सामंत व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेली दहा वर्षे खासदार, आमदार हे ठाकरे शिवसेनेचे असताना शहरातील विकासकामे का पूर्ण झाली नाही? शहरात फक्त विकासकामांचे सांगाडे उभे केले आहेत, याबद्दल आम्ही अनेकदा टिका केली होती. त्यावेळी मंदार केणी हे गप्प का होते? त्यांना आताच जाग का आली ? संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून नविन ठेकेदार नियुक्त करण्यासाठी त्यांना कोणी थांबविले होते? स्पोर्टस् कॉम्प्लेक्स पूर्ण करण्यात ठेकदार अयशस्वी ठरला असल्याने ते काम रखडले होते. भाजी मंडई, नाट्यागृह परिसरातील बांधकाम ही काम वेळीच पूर्ण झाली नसल्याचे आताच समजून आले आहे का? दहा वर्षात खासदार, आमदार यांनी यासाठी काय पाठपुरावा केला? असाही सवाल श्री. आचरेकर यांनी उपस्थित केला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी मालवण बसस्थानकावर टॉकीज करून त्याठिकाणी सौराट सिनेमा दाखविण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र गेली दहा वर्षे टॉकीजवर सैराट लागलाच नाही, आणि होते ते बसस्थानक खराब करण्यात आल्याने त्याठिकाणी प्रवाशांसाठी साधे शौचालयही सध्या बांधण्यात आलेले नाही. आपण करायचे नाही, आणि दुसरे करत असतील तर त्यांनाही त्रास द्यायचा, ही भूमीका आता विरोधकांनी बंद करावी. मालवण शहरातील रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याची धमक पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यामध्येच आहे, असेही श्री. आचरेकर म्हणाले.
जनतेला नेहमी खोटं सांगून फसविण्याचा प्रकार संपलेला आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत उबाठाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाल्याने आता उबाठाची ताकद संपलेली आहे. यामुळे आपल्या लोकांना उपोषणला पुढे करून आपणच मागे घेण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आमदारांवर आलेली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार आमसभा घेऊ शकत नाही, आणि जनता दरबारावर टिका करत आहे. यामुळे आता खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदार संघावर भाजप आपली ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज झाला आहे, असेही श्री. आचरेकर म्हणाले.
