सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना गोव्याची दारे ही नेहमीच खुली…

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर:
भविष्यात संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करणार..

⚡बांदा ता.१७-: गोवा व सिंधुदुर्गचे नाते हे ऋणानुबंधनाचे आहे. पर्यटन, संस्कृती व शैक्षणिक क्षेत्रात दोन्ही प्रदेशात समानता आहे. आरोग्य, रोजगार व शैक्षणिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना गोव्याची दारे ही नेहमीच खुली आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळमुळे हजारो रोजगार उपलब्ध झाले आहेत. गोव्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील याचा फायदा झाला आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवीणारा कोकण पॅटर्न आहे. त्यामुळे भविष्यात संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत निश्चितच प्रयत्न करण्याचे आश्वासन गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी बोलताना दिले.

खासगी कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या प्रा. पार्सेकर यांनी बांद्यात काहीवेळ थांबून स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी बांद्याचे उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, हुसेन मकानदार, निलेश कदम, श्री भक्त सेवान्यास मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, पत्रकार निलेश मोरजकर, कर सल्लागार समीर परब, रियाज खान यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रा. पार्सेकर यांनी राजकारण, समाजकारण, आरोग्य, शिक्षण यावर मनमोकळेपणाने सविस्तर चर्चा केली. उपसरपंच श्री सावंत यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा बांबोळी येथे उपचारासाठी जावे लागत असल्याने त्याठिकाणी वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. निलेश कदम यांनी जिल्ह्यातील हजारो तरुण हे नोकरीनिमित्त गोव्यात ये – जा करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी प्रा. पार्सेकर यांनी मोपामुळे हजारो रोजगार उपलब्ध झाले असून याचा सर्वाधिक फायदा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला असल्याचे सांगितले. भविष्यात उत्तम दर्जाच्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासक्रम सुरु करण्याचा आपला मानस आहे. त्यामुळे याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

You cannot copy content of this page