भजनसम्राट भालचंद्र केळूसकर: जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद..
मालवण (प्रतिनिधी)
दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात होत असलेली भजन स्पर्धा आदर्श घेण्यासारखी आहे. याठिकाणी अतिशय शिस्त पाळली जाते. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. तरीदेखील कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. यासाठी दत्ता सामंत दाखवत असलेले औदार्य आणि ग्रामस्थांची त्याला असलेली साथ यामुळेच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या भजन स्पर्धेचा नावलौकिक झाला आहे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करताना स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन भजन सम्राट भालचंद्रबुवा केळूसकर यांनी घुमडे येथे बोलताना केले.
मालवण तालुक्यातील घुमडे येथे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या “श्रावणधारा” कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घुमडाई मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी श्री. केळूसकर बुवा बोलत होते. या स्पर्धेचे उदघाटन घुमडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष भाई परब यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत, परीक्षक भालचंद्र केळूसकर बुवा, जनार्दन देसाई, बाबू बिरमोळे, गोपी लाड, उमेश देसाई, प्रदीप बिरमोळे, रामदास बिरमोळे, दत्ताराम सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भालचंद्र केळूसकर यांनी स्पर्धेच्या सातत्यपूर्ण आयोजनाचे कौतुक केले. दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रत्येक ग्रामस्थ मंदिरातील कार्यक्रम आपल्या घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे योगदान देतो. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. देवीचा आशीर्वाद या मंडळींच्या पाठीशी आहे, येथे येणाऱ्या भजन मंडळानी या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे सांगून गेली दहा वर्षे ही स्पर्धा हसत खेळत सुरु आहे. या स्पर्धेला गालबोट लागेल असे वर्तन कोणी करू नये, आणि स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेचे उदघाटक भाई परब म्हणाले, श्रावणधारा ही संकल्पना दत्ता सामंत यांच्याकडून आलेली आहे. ते कलेचे उपासक आहेत. ज्या गुरूंनी आपल्याला भजन शिकवलं, त्या गुरुचा योग्य तो सन्मान करण्यासाठी सतत दहा वर्षे या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतून आपल्या गुरूला गुरुदक्षिणा ते देत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी उद्योजक बाबू बिरमोळे यांनी देखील विचार मांडले. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी करून आभार मानले. यावेळी माजी सरपंच दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, दत्तू बिरमोळे, अंकित बिरमोळे, राजा बिरमोळे, गणपत बिरमोळे, निहार टेम्बुलकर, संकेत बिरमोळे, उमेश परब, सुभाष गावडे, भूषण गावडे, भाऊ सावंत, दिनेश बाईत, सुनील टेम्बुलकर, शानू वालावलकर, सूरज बिरमोळे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
