पहाटेची घटना: ८ लाखांचे नुकसान..
⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा येथील समुद्रातील खडकाळ भागात आज मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास राजेश कमलाकर शेलटकर यांच्या मालकीची शिवनंदन ही मच्छिमारी नौका (क्रमांक IND -MH 5-MM-2080) सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकावर आदळून फुटल्याची दुर्घटना घडली. यामुळे मच्छिमार शेलटकर यांचे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने नौकेवरील चारही खलाशी सुखरूपपणे किनाऱ्यावर आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
कोळंब येथील श्रीकृष्ण मंदिर नजीक राहणारे राजेश कमलाकर शेलटकर हे काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास सर्जेकोट बंदरातून आपल्या मालकीची शिवनंदन नावाची गिलनेट मच्छिमारी नौका घेऊन खलाशांसह मच्छिमारी साठी समुद्रात गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत संतोष वेंगुर्लेकर, गणेश हिंदळेकर, भरत कवटकर हे होते. आज पहाटेच्या सुमारास शेलटकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत मच्छी घेऊन सर्जेकोट बंदरात येत असताना सर्जेकोट बांदा परिसरात वादळी वाऱ्यामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे नौका खडकावर आदळल्याने नौका फुटली. यामुळे नौकेत पाणी शिरल्याचे दिसताच प्रसंगावधान राखून शेलटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्रात उड्या घेतल्या व नौका वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र नौका जाळी व इतर साहित्यासह समुद्रात बुडाली. तर शेलटकर यांच्यासह चारही खलाशानी समुद्र किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.
