माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघाने काढला मोर्चा…

विविध मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने वेधले लक्ष..

सिंधुदुर्गनगरी ता ६
शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संघांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये आणि शासन स्तरावर मुख्याध्यापक संघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे १९ जुलै रोजी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सभेत या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी आंदोलन मोर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.. आपल्या मागण्या मान्य करा.. रिक्त पदे भरा आदी विविध घोषणा देण्यात आल्या.

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी, पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी. शिक्षकेत्तर भरती करावी, अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळातील रिक्त पदांची शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी, या शाळांना टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने ताबडतोब जाहीर करावे, वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार शाळांना मिळावे, १५ मार्च २०२४ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा अथवा दुरुस्ती करावी. वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी परवानगी मिळावी, मूल्यांकन पात्र विद्यालयांना अनुदान जाहीर करावे, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत, शिक्षकेतर संचमान्यता नवीन निकष अनुसार अतिरिक्त ठरलेल्या वरिष्ठ लिपिकांना सेवानिवृत्तीपर्यंत त्या शाळेत कार्यरत ठेवावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगावकर, उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, हनुमंत वाळके, रत्नाकर सरवणकर, सुभाष दहिबांवकर, प्रमोद कांबळे, जयवंत ठाकुर आदीसह मोठ्या संखेने मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page