ओरोस ता ५-:चालू खरीप हंगामामध्ये सिंधुदुर्ग मध्ये 50 एकर क्षेत्रावर भरडधान्य लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा किर्लोस कृषी विज्ञान केंद्र प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी दिली. नाचणीच्या बियाण्याचा पुरवठा कृषी विज्ञान केंद्राद्वारे 500 शेतकऱ्यांना करण्यात आला. त्याचे लागवड बाबत जनजागृती सुद्धा शेतकऱ्यांत करण्यात येत आहे.
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली केंद्राने भरडधान्य लागवड अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. चालू खरीप हंगामामध्ये सिंधुदुर्ग मध्ये 50 एकर क्षेत्रावर भरडधान्य लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पोषणमूल्य व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा भरड धान्यांना बळकटी देण्याचे प्रयत्न कृषी विज्ञान केंद्राद्वारे चालू आहेत. या भरडधान्याला “श्री अन्न” म्हणून संबोधले जाते. या अभियानाच्या माध्यमातून भरडधान्य पिकांना नवसंजीवनी प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. भरड धान्याच्या विविध पोषक घटकांमुळे भरडधान्याचे आहारातील महत्त्व वाढत आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी दिली.
भारताच्या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी हरितक्रांतीच्या माध्यमातून मुख्यत्वे गहू व तांदूळ पिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे काळाच्या ओघात भरडधान्य पिके लागवडीमध्ये मागे पडली गेली. या पिकांची जनजागृती व्हावी व लागवड करून क्षेत्र व उत्पादकता वाढावी यासाठी किर्लोस कृषि विज्ञान केंद्राने ही मोहीम हाती घेतली आहे. खरीप हंगामामध्ये नाचणीच्या बियाण्याचा पुरवठा कृषी विज्ञान केंद्राद्वारे जवळपास 500 शेतकऱ्यांना करण्यात आला. कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या नाचणीच्या सुधारित जाती दापोली- १, दापोली – २, दापोली – ३ व दापोली सफेद या जातींचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले असून लागवड तंत्रज्ञानाची जनजागृती शेतकऱ्यांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कमी होत चाललेली भरडधान्य पिकांची लागवड वाढविण्यासाठी व भरडधान्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहारात होण्यासाठी किर्लोस कृषि विज्ञान केंद्र हे अभियान राबवत असल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:
