लस उपलब्ध होताच लसिकरण सुरु करणार;डॉ बालाजी पाटील यांची माहिती
मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपल्याने येथील लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. लवकरच लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करून लस साठा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मंदार केणी, यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, बाळू नाटेकर, आतू फर्नाडिस, मोहन मराळ, यशवंत गावकर, किशोर गावकर, किरण वाळके, सचा गिरकर, तपस्वी मयेकर, नरेश हुले, सन्मेश परब आदी उपस्थित होते. डायलेसीस सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी आणखी एक १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही नाईक यांनी सांगितले. मालवण तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये कोविड लसीचे ३०० डोस शिल्लक आहेत. हे डोस लवकरात लवकर संपविण्याच्या सूचना तालुका आरोग्य विभागाने केल्या आहेत. लवकरच नवीन डोस उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले. तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी कोविशिल्डचे २०९० डोस, तर कोवँक्सीनचे १२५० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. यातील कोविशिल्डचे १८४० डोस, तर कोवँक्सीनचे १०८० डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. सध्या कोविशिल्डचे १८० आणि कोवॅक्सीनचे १२० डोस शिल्लक आहेत.
