टोपीवाला हायस्कुलमध्ये कला कार्यशाळा संपन्न…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण एज्युकेशन सोसायटी, टोपीवाला हायस्कूल आणि सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये कला कार्यशाळा पार पडली. यामध्ये सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य माणिकराव यादव प्रा. अमित सुर्वे, प्रा. रुपेश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना विविध कला विषयांबाबत मार्गदर्शन करून स्थिरचित्रण व शिल्पकला यांची प्रात्यक्षिकेही दाखवली.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री. वळंजू यांनी प्रास्ताविक करत टोपीवाला हायस्कूलची कला परंपरा आणि इतिहास यांची पार्श्वभूमी मांडली. मुख्याध्यापक वळंजू यांच्या हस्ते प्राचार्य माणिकराव यादव, प्रा. अमित सुर्वे, प्रा. रुपेश सुर्वे आणि अधीक्षक श्री. पवार यांचा शाळेच्या व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अमित सुर्वे यांनी पीपीटीच्या माध्यमातून सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकवले जाणारे वेगवेगळे विषय आणि त्यांची व्याप्ती यासंबंधी मार्गदर्शन करून मुलांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीची चित्रे ,शिल्पे यांची माहिती दिली. प्राचार्य माणिकराव यादव यांनी संस्थेच्या सर्व शाखा आणि संस्थेचे सर्व कोर्स कलेशी संबंधित संस्थेचा आलेख मांडला. त्यानंतर प्रा. अमित सुर्वे यांनी स्थिरचित्रणाचे प्रात्यक्षिक जलरंगामध्ये केले. दुसऱ्या सत्रात प्रा. अमित सुर्वे यांनी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष दिगंबर सामंत यांचे ऑइल कलर मध्ये पेंटिंग करून त्यातील बारकावे मुलांच्या लक्षात आणून दिले. तर प्रा. रुपेश सुर्वे यांनी श्री. सदा चुरी यांचे मातीचे शिल्प साकारत शिल्प साकारण्याची तपशीलवार माहिती मुलांना दिली.

या कार्यशाळेचे नियोजन शाळेचे कलाशिक्षक बी.जी सामंत यांनी केले. पर्यवेक्षक गोसावी सर यांनी आभार मानले. या कार्यशाळे दरम्यान मुलांच्या ग्रेड परीक्षा आदर्श चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी राखी अरदकर, सतीश बनसोडे, प्रफुल्ल सामंत व शाळेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page