ग्रामस्थांनी प्रशासनाला धरले धारेवर: असा प्रकार पुन्हा घडल्यास कायदेशीर कारवाई करू; प्रियंका नाईक..
⚡बांदा ता.३०-: बांदा शहरातील देऊळवाडी, रामनगर, लकरकोट परिसरात गेले आठ दिवस पाणी पुरवठा करण्यात न आल्याने आज संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सटमटवाडी ग्रामस्थांनी देवकोंडी येथे पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याने पाणी सोडण्यास विलंब झाल्याची माहिती सरपंच यांनी दिली. आज जर पुन्हा असा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करून पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन सरपंच नाईक यांनी ग्रामस्थांना दिले.
बांदा देऊळवाडी, रामनगर परिसरात गेले आठ ते दहा दिवस ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा बंद आहे. संपूर्ण उन्हाळ्यात सटमटवाडी येथे हायवेवर बोगद्याचे काम सुरु असल्याने जलवाहिनी फुटल्याने या परिसरातील पाणीपुरवठा बंद होता. त्यावेळी देखील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने स्थानिक नाराज झालेत. याबाबत पाणी सोडणाऱ्या नळ कामगाराकडे माहिती घेतली असता त्याने सटमटवाडी देवकोंडी येथे पाणी सोडण्यासाठी येऊ नये अशी धमकी वाडीतील ग्रामस्थांनी दिल्याची माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. आज सकाळीच ग्रामपंचायतवर धडक देत जाब विचारला.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला धमकी दिली जाते यावर ग्रामपंचायत प्रशासन गप्प का असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर मला एक दिवसाची मुदत द्या. आज सायंकाळी आपण स्वतः कर्मचाऱ्यासोबत जाऊन पाणी सोडण्यस सांगते. त्यावेळी विरोध झाल्यास आपण कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन सरपंच नाईक यांनी दिले. सटमटवाडी ग्रामस्थ यांची बोगद्याकडे सेवा रस्त्याची मागणी आहे. मात्र त्याचा प्रश्नाशी देऊळवाडी रामनगर वासियांचा काहीही संबंध नसून आपण पाणी पुरवठा कधी सुरु करता असा सवाल ग्रामस्थांनी केला. देऊळवाडी हा प्रभाग क्रमांक एक मध्ये येतो. मात्र नेहमीच देऊळवाडीला सापत्नभावाची वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रभागातील तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. चर्चा न करता पाणी सोडण्याऱ्या कर्मचाऱ्यांना धमकी देणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी देऊळवाडीतील पथदीप हे गेले कित्येक दिवस बंद आहेत. तसेच जलजीवनची जलवाहिनी ही देऊळवाडीत टाकण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली असता सरपंच यांनी शहरात अद्याप ९ किलोमीटर जलवाहिनीचे काम शिल्लक असून त्यावेळी प्रधान्याने याठिकाणी जलवाहिनी टाकण्यात येईल.
यावेळी सरपंच नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रेश्मा सावंत, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, ग्रामस्थ गजानन गायतोंडे, भाऊ वाळके, अजय महाजन, हर्षद कामत, सुनील माजगावकर, आशु सावंत, मयूर परब, संकेत माजगावकर, आकाश सावंत, रोहन सुपल, गुरुनाथ साळगावकर, गौरांक साळगावकर, जगत बोगटी, प्रशांत सावंत, देवेश वारंग, प्रथमेश साटेलकर, भाग्येश धुरी, संदेश शेगडे, अक्षय मयेकर, बल्लो माजगावकर आदिसह देऊळवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
