जिल्ह्यात तापमानाचा पारा निकषापुढे…

फळ पिक विमा नुकसानी मिळावी

सिंधूदुर्गनगरी ता ५ जिल्ह्यातील उष्णतेने सर्वच भागांत ३७ तापमान पार केले आहे. देवगड, कणकवली सारख्या तालुक्यात ४१ च्या पुढे तापमान गेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील फळ पिक नुकसानीला हे तापमान शासकीय निकषात बसत असल्याने याबाबत विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद कृषि समिती सभेत करण्यात आली. कृषि समितिची तहकूब सभा दुपारी बँ नाथ पै सभागृहात संपन्न झाली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यानी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. मात्र, हा राजिनामा अद्याप जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यानी मंजुर केलेला नाही. सभेला म्हापसेकर अनुपस्थित होते. त्यामुळे उपस्थित सदस्यांतील गणेश राणे यांचे नाव रणजीत देसाई यानी सभाध्यक्ष पदासाठी सूचविले. त्याला प्रितेश राऊळ यानी अनुमोदन दिले. त्यानुसार राणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य अमरसेन सावंत, अनुप्रिती खोचरे, सुधीर नकाशे उपस्थित होते. सभेत सदस्यांनी जिल्ह्यातील पारा किती पर्यंत गेला होता ? असा प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना राज्य कृषि विभागाच्या अधिकाऱ्यानी जिल्ह्यात ३७ ते ३८ तापमान वाढले होते. देवगड, कणकवली सारख्या तालुक्यात ४१ पर्यंत तापमान पोचले होते. तर जिल्ह्यात २३ फेब्रूवारी रोजी शेवटचा पाऊस पडला होता, अशी माहिती दिली. यावेळी सदस्यांनी फळ पिक नुकसानी मिळण्यासाठी किती तापमान आवश्यक आहे, असे विचारले. यावर अधिकाऱ्याने ३६ अंश सेल्सियस तापमान आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे शासन निकषाच्या पुढे तापमान गेल्याने विमा नुकसानी तात्काळ मिळावी, अशी मागणी केली. त्याप्रमाणे ठराव घेवून शासनाला पाठविण्याचे आदेश प्रशासनाला अध्यक्ष राणे यानी दिले. यावेळी सुधीर नकाशे यानी गेल्यावर्षी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बी-बियाणे वाटप केले. परंतु यातील महाबीजचे बियाणी बोगस निघाली. त्यामुळे यावर्षी चांगल्या दर्जाची बियाणी वाटप करावी, अशी मागणी केली. तसेच खरीप हंगाम जवळ येत असल्याने नियोजन करण्याची मागणी केली. रणजीत देसाई यानी जिल्ह्यातील शेती क्षेत्र वाढत आहे. कोरोनामुळे अनेक लोक शेतीकडे वळले आहेत. याचा अभ्यास करून खरीप हंगाम नियोजन करण्याची मागणी केली. यावेळी देसाई यानी सभागृहाची माईक सिस्टीम नादुरुस्त झाली आहे. ती बदलावी. तसेच नवीन खुर्च्या घ्याव्यात अशी मागणी केली. अमरसेन सावंत यानी जिल्ह्यातील दूध उत्पादक यांचे प्रतिभा दूध डेअरीने कोठयांनी रुपये थकविले आहेत. ते मिळावेत अशी मागणी केली.

You cannot copy content of this page